स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!


एचके लर्निग अँड एनएए 
आयुष्य म्हणजे काय? बाल्यावस्था, तारुण्यवस्था अन्‌ वृद्धावस्था की संपलं आयुष्य. या तिन अवस्थांचं नावचं आयुष्य. या अवस्था जगत असताना सुख अन्‌ दु:ख ही कुंपणं पार करावी लागतात. मन अन्‌ शरीर भोगी असतात. प्रत्येक शरीराची ओळख पटावी म्हणून नावे दिली जातात. शरीर जिवंत असल्याचं लक्षण म्हणजे त्या शरीराच्या हालचाली अन्‌ त्यात असलेलं मन. या मनाला नाव तर नसतंच शिवाय हे अदृष्य व निराकार असतं. मात्र शरीराकडून कुठलंही कार्य करून घेण्याचं सामर्थ्य या मनात असतं. याही पलीकडे शरीरात असणारे पंचज्ञानेद्रिय या मनावर अधिराज्य गाजवतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे आचार, विचार भिन्न असतात. म्हणून इंद्रियांवर नियंत्रण ठेवा, स्वनियंत्रक बना... आयुष्य आनंद यात्री म्हणून जगा... आचार-विचार शुद्ध असू द्या... क्षमावंत व्हा... राग, लोभ, अहंकार, हट्ट, मीपणा यापासून मुक्त व्हा... मित्र-परिवाराशी बोलते व्हा... वाद-विवाद क्षणिक असू द्या... जगण्याचा महाप्रवास आहे तोवरच एकमेकांना भेटाल, बोलाल नंतर सर्वकाही शून्य... अन्‌ केवळ शून्यच... याची जाणीव असू द्या..!  

शब्द म्हणजे शस्त्र
शब्द हे केवळ शब्द नसून भाव-भावना व्यक्त करण्याचं यशस्वी माध्यम आहे. शब्दांचा वापर विचार करूनच करायला हवा. शब्दनिर्मिती मनात होते मात्र इतरांपर्यंत पोहचते ते जिभेद्वारे, म्हणून जिभेवर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे. भोवतालचे वातावरण आनंदी ठेवयाचे की तणावात हे आपल्यावरच अवलंबून असते. म्हणून संवाद असू द्या, वाद नकोच...! संवादातून आपुलकी वृद्धिंगत होते तर वादातून दूरावा निर्माण होऊन मनं दुखावली जातात. म्हणूनच कबीर म्हणतात... 

ऐसी बानी बोलिए, 
मन का आपा खोय। 
औरन को शीतल करै, 
आपहु शीतल होय।।
अर्थात मान आणि अहंकाराचा त्याग करून असं बोला की इतरांसह स्वत:लाही आनंद मिळेल. गोड बोलूनच मनाला जिंकता येतं. कटू शब्दांनी मनं दुखावतात. एखाद्याविषयी कितीही राग असू द्या, तो क्षणिक असावा अन्‌ कटू शब्द न वापरता राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा. 

भूमिका बदलवता आली पाहिजे
कुटुंबासोबत वावरताना आपण कुठल्या भूमिकेत असायला हवे, हे वेगळे सांगायला नको. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी प्रेम, आपुलकी, नि:स्वार्थपणा हे भाव मनात असायलाच हवे. मात्र, बऱ्याच कुटुंबात याउलट बघायला मिळते. प्रत्येक जण एकमेकांना अपमानीत करण्यातच धन्यता मानतात. घर म्हणजे चार भिंती नसून त्या चार भिंतींच्या आत मायेचं पांघरून असतं... जिवापाड प्रेम करणारी माणसं असतात... रात्रंदिवस एकमेकांच्या काळजीने व्याकूळ असणारी मनं असतात. हे कुणीही विसरू नये... म्हणून पत्नी, आई-बाबा, मुलं, भाऊ अश्‍या विविध नात्यांसोबत वावरताना त्या-त्या भूमिकेत वावरता आलं पाहिजे. प्रत्येक नात्यासोबत कसं वागावं हे विस्तारपूर्वक कथन करण्याची येथे आवश्‍यकता वाटत नाही. केवळ ‘रामायण’ ही चार अक्षरं सर्व संस्कार सांगून जातात. कुटुंबप्रमुख म्हणजे दंडूकशाही नसून आधारस्तंभ अन्‌ आदर्श होता आलं पाहिजे.

राग अन्‌ अबोला महाभयंकर विषतूल्यच
दिवसभरात प्रिय अन्‌ अप्रिय घटना घडतच असतात. तो एक जगण्याचा भागच आहे. प्रिय घटनांचा साठा मनात नक्कीच करा, कारण त्या घटना मनप्रसन्न करणाऱ्या असतात. मात्र अप्रिय घटनांना ठराविक कालावधीनंतर मनातून कायमच्या पुसता आल्या पाहिजे. थोडक्यात स्वच्छता अभियान मनातही राबवा. राग, अबोला क्षणिक असून द्या... राग, अबोला हे महाभयंकर विषतूल्यच आहे. जोपर्यंत मनात यांचे वास्तव्य तोपर्यंत इतरांसह स्वत:ही अस्वस्थ अन्‌ अस्थिर राहाल. 

चुका स्वीकारून दुरुस्त करा
स्वत:ला स्वत:ची चूक शोधता येत नाही, आपणच बरोबर असा स्वभाव बनत जातो. कुणाचे काहीही एैकायचे नाही, अशी वृत्ती बळावत जाते. घरातला वावर इतरांना भीतीदायक वाटायला लागतो. भीती असायला हवी मात्र ती आदरयुक्त भिती असायला हवी याचा विसर पडतो म्हणूनच स्वत:च्या चुका शोधण्याचा प्रयत्न करा. अन्यथा चुकीच्या निर्णयांनाही घरातील सदस्यांची मूकसंमती मिळते अन्‌ त्याचे परिणाम स्वत:सह संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून घेतलेला निर्णय योग्य का अयोग्य हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक सदस्याचे मत घ्या, अशा वर्तनातून  मी अन्‌ अहंम या विनाशकारी वृत्तीलाही संपवता येईल. शक्यताे आपली माणसं आपल्या चुकांवर काळजीपोटी किंवा भितीपोटी पांघरून घालत असतात म्हणून कायम आपली निंदा करणाऱ्यांकडे फेरफटका मारत चला. त्यांच्याकडून कळत-नकळत आपल्या चुकांची यादीच हातात येईल. त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा.  कबीर म्हणतात...

निंदक नियरे राखिए, 
आंगन कुटी छवाय, 
बिन पानी, साबुन बिना, 
निर्मल करे सुभाय।
अर्थात जी लोक आपली निंदा करतात त्यांना आपल्या जवळच असू द्या, कारण ते आपल्यात असलेल्या चुका, उणिवा स्पष्ट शब्दात सांगून स्वभाव सुधारण्याचं काम तर करतातच शिवाय मनही स्वच्छ करतात. आयुष्यातले खरे हितचिंतक यांनाच समजावं.

कटू, ...पण सत्य स्विकारा...!
शेवटी एकच सांगावेसे वाटते, आयुष्याचा प्रारंभ जन्म तर शेवट मृत्यू... या जन्म आणि मृत्यूमधलं जे अंतर आहे ते आयुष्य... मृत्यू नावाचा पडदा पडला की नाटक संपलं... काळाच्या पडद्याआड... कायमचं... नाती-गोती, माझं-तुझं, मी-तू, सर्वकाही नामशेष... ज्या भिंतीच्या आत या पाच फुटाच्या देहाचा वावर होता त्याच  कुठल्यातरी भिंतीवर एका छोट्याश्‍या चौकटीत फोटो अन्‌ त्यावर फुलांचा हार... 

क्षणभर अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्यासारखंच आहे हे... म्हणून जगा अन्‌ जगू द्या... क्षमाशील व्हा... भोवताली आंनद पेरा... 

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक आहेत.


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

लोक काय म्हणतील..?

विचारांना समजून घेताना

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

मनगाभाऱ्यातील मैत्रीसंवाद

अचेतन मन एक दिव्यशक्ती..!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती