कुटुंबातील आदर्श पालकत्व अन् मुलं
मुल जन्माला येतं तेव्हाच आई-बाबांचाही जन्म होतो, असं म्हणायला हरकत नाही. आई-बाबा या सर्वोच्च पदाचे मानकरी होणं काय असतं, हे शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाहीच. याची अनुभूती प्रत्येक नवदांम्पत्याने आई-बाबा झाल्यावर अनुभवलीच असेल. मुल जसजसं मोठ होत जातं तसतसं आई-बाबांभोवती काळजी अन् जबाबदारी नावाचं रिंगण गडद होत जातं. त्यातूनच जन्म होतो पालकत्वाचा..! हे पालकत्व आई-बाबांसह घरातील मोठी माणसं पार पाडत असतात. नुसतं पालकत्व हा शब्द माहित असून चालत नाही, तर ‘कुटुंबातील आदर्श पालकत्व’ हे कौशल्य पालकांना आत्मसात करावं लागतं. आयुष्य जगत असताना निसर्गाद्वारे अशी कौशल्ये आपोआप आत्मसात होत असतात. मात्र त्यासाठी मनस्वी तयारी असायला हवी.
नियोजन करून मुलांसाठी वेळ काढा..!
नियोजन करून मुलांसाठी वेळ काढा..!
आदर्श पालकत्व कसे असावे, या विषयी पालकांमध्ये नेहमीच चर्चा होत असते. नोकरी आणि व्यवसायामुळे पालक व्यस्त असतात. त्यामुळे मुलांसाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याची कारणं समोर येतात. मुलांना पालकांचे प्रेम आणि सहवास मिळत नसल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम मुलांच्या मानसिकतेवर दिसून येतो. नोकरी अन् व्यवसायामुळे पालक व्यस्त असतात हे जरी खरे असले, तरी मुलांना वेळ देता येत नाही, असं म्हणणं पचणी पडण्यासारखं मुळीच नाही. वेळेचे नियोजन करून मुलांसाठी वेळ नक्कीच काढता येतो, हे कुणीही नाकारू शकत नाही. अनावश्यक कृतींना तिलांजली दिली की, आपोआप आवश्यक असलेल्या अन् महत्त्वाच्या कामांना वेळ देता येतो. आत्मपरिक्षण केल्यास हे नक्कीच स्वत: स्पष्ट करता येईल. दिवभरातील कामांची विभागणी करून, किमान अर्धा तास तरी नक्कीच मुलांसाठी काढता येतो. यावरही काही पालकांकडे वेळ नसल्याचे कारण उपलब्ध असेल, तर मग अशा अस्थिर अन् नियोजनहीन जगण्याला अर्थहीन जगणंच म्हणावं लागेल.
मुकं अन् बहिरं करणारं सोशल मिडीया..!
मुकं अन् बहिरं करणारं सोशल मिडीया..!
सोशल मिडीयामुळे परस्परांमधील संवाद संपत चालला आहे. पुर्वी घरातील कोपरा कचरा साचवण्यासाठी असायचा, मात्र आज त्याच कोपऱ्यात तासंतास मोबाईलवर घालवली जातात. आरडा-ओरड करून मुलाला अभ्यास कर म्हणून सांगितलं जातं. अन् स्वत:ला मात्र विविध सोशल मिडीया ग्रुपवर मुकं अन् बहिरं करून घेलतं जातं. याआधी मुकं अन् बहिरं करण्याचं काम टीव्हीने केलं होतं, मात्र ते मर्यादीत असायचं. स्मार्ट फोन आल्यापासून काही घरांतील माणसे मुके, आंधळे अन् बहिरे झाल्यासारखेच वाटतात. त्यातल्या त्यात मोबाईलमध्ये स्टेट्स, लाईक अन् शेअर करण्यासाठी दिवसभरात कितीदा मोबाईल हाताळला जात असेल, हे ज्यांनी त्यांनीच आत्मपरिक्षण करावे...! महिला वर्गाचा आवडता छंद म्हणजे स्वत:ला आरशात न्याहाळणे. मात्र स्मार्टफोन आल्यापासून आरसा बिचारा केविलवाणा होऊन माझ्यात कुणी डोकावतं का? असा प्रश्न करत दिवभर उभा असतो. या स्मार्टफोनमुळे मनामनातले अंतर वाढून माणूसपणाचा अंत होताना दिसत आहे. निवांतक्षणी कुटुंबातील माणसांची, आर्थिक विकासाची चर्चा न करता एकमेकांना सोशल मिडीयावरील विविध पोस्ट दाखवण्यातच धन्यता मानली जाते. यात तातडीने परिवर्तन होणे गरजेचे आहे. अन्यथा आदर्श पालकत्वाचे वर्तमान अन् भविष्यही अंधकारमय असेल, हे वेगळे सांगायला नको.
अयोग्य वर्तणुकीवर नजर अन् गुणांचं कौतुक
अयोग्य वर्तणुकीवर नजर अन् गुणांचं कौतुक
आदर्श पालकत्वामुळेच मुलांमधील वर्तणूकीसह सामाजिक कौशल्येही वृद्धिंगत होतात. मुलांच्या अयोग्य वर्तणुकीवर नजर ठेवत त्यांच्या चांगल्या कार्याचे कौतुक करणं, म्हणजे मुलांमधील उत्साह अन् आत्मविश्वास वाढवणं असतं. असे केल्याने लहान वयापासूनच मुलांमध्ये चांगलं अन् वाईट ओळखण्याची सवय लागते. प्रेम, आनंद, शांतता, संयम, चांगुलपणा, दयाळू वृत्ती, विनम्रता, विश्वासूपणा आणि स्वनियंत्रण या गुणांचा मुलांमध्ये विकास कसा होईल याकडे पालकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यासाठी पालकांनी हे गुण स्वत: आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण उपदेशापेक्षा कृतीतून समजावून सांगणे कधीही लक्षवेधी अन् उत्तम मार्गदर्शक ठरते.
आत्मविश्वास म्हणजे संकटमोचक...!
आत्मविश्वास म्हणजे संकटमोचक...!
पालकांनी मुलांकडूनच अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांना घडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजे. असे केल्यास ते आपल्या मुलांसाठी योग्य मार्गदर्शक नक्कीच बनू शकतात. मुलांची काळजी करणे सहाजिक आहे, पण त्या काळजीतून मुलांमधील आत्मविश्वास तर नाहीसा होत नाही ना, याची प्रत्येक पालकाने काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे. आयुष्य जगत असताना हा आत्मविश्वास आपल्या मुलांसाठी संकटमोचक म्हणूच काम करत असतो, हे विसरता कामा नये. मुलांशी वागताना पालकांनी वेळोवेळी आत्मपरिक्षण करणेही गरजेचे आहे. पालक अन् मुलांमधील दरी निर्माण होण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात. त्या म्हणजे मुलांशी बोलताना वापरण्यात येणारी भाषा अन् पालकांची देहबोली. यावर पालकांचे नियंत्रण असायलाच हवे. पालकांच्या रागावण्यातही मुलांना प्रेमाचा मनस्वी स्पर्श जाणवायला हवा. भिती असायला हवी, मात्र ती आदरयुक्त भिती असायला हवी.
मुलांना समजून घेताना..!
मुलांना समजून घेताना..!
पालकांनी मुलांच्या यशापयशात वाटेकरी होण्याची मानसिक तयारी ठेवायला हवी. मुलांना समजून घेताना आपणही कधीकाळी मुलं होतो याचा विसर न पडता, ‘तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी’ असं बोलून निर्धास्त करता आलं पाहिजे. सतत उपदेशाचे डोस देणे कुणालाच आवडत नाही याची जाणीव मनस्वी असू द्या...! टोचून बोलण्यापेक्षा काही गोष्टी कृतीतूनही शिकविता आल्या पाहिजे. मुलांमधील क्षमता ओळखून त्यांना त्या दिशेने विकसित करा. आपल्या इच्छा, आकांक्षा मुलांसमोर जरूर मांडा; मात्र त्याबाबत आग्रही राहू नका..! प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात, याची जाणीव असू द्या...! आपल्या मुलांची स्वप्ने आपल्यापेक्षा भिन्न असू शकतात. म्हणून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी दिशादर्शक अन् आधारस्तंभ बना, त्यांच्या यशाचे साक्षीदार व्हा..!
आपलं वागणं, बोलणं संस्कारी हवं..!
आपलं वागणं, बोलणं संस्कारी हवं..!
मुलांना शिस्त असायलाच हवी. हा सर्वच पालकांसमोर यक्ष प्रश्न आहे. मुलांना शिस्त लावण्याचा साधा अन् सरळ उपाय म्हणजे स्वत: शिस्त लावून घेणे. आपली शिस्त बघून आपोआपच मुलांनाही शिस्त लागायला सुरूवात होते. घरात वावरताना आपलं वागणं, बोलणं संस्काराला धरून असेल, तर मुलांना संस्कार म्हणजे काय? हे वेगळं शिकवाव लागत नाही. आपल्याच कृतीतून त्यांच्यासाठी आपण स्वत: संस्काराचे उदाहरण बनू शकतो. मुलांवर कोरड्या उपदेशांपेक्षा प्रत्यक्ष वातावरण अन् कृतीचा परिणाम अधिक होतो. मुलांना शिक्षा करण्याची वेळ येऊ नये, असे वातावरणही भोवताली निर्माण करता आले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक शिक्षेचाही मुलांवर खूप मोठा परिणाम होतो. त्यातून मुले कोडगी बननण्याची शक्यता अधिक असते. म्हणून मुलांना शिस्त लावण्याच्या नादात वाद अन् त्यांना मारठोक मुळीच करू नये. संवादातून प्रश्न कसा सोडवता येईल हे पाहावे.
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक आहेत.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
खूप छान माहिती दिल्याबद्दल सरांचे मनापासून आभार
उत्तर द्याहटवा