शेअर बाजार समजून घेताना

एचके लर्निंग अँड एनएए :
कौटुंबिक आयुष्य सर्वसंपन्न आणि समाधानकारक असावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने नियोजन करत असतात. त्यासाठी आर्थिक आधार भक्कम करण्यावर भर दिला जातो. जसे लक्ष तसा नोकरी, व्यवसायाही निवडला जातो.  एवढे करूनही उत्पन्न वाढीसाठी पर्याय शोधणे काही थांबत नाही. तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत शेअर बाजाराकडे उत्पन्न वाढीसाठी उत्तम पर्याय म्हणून पाहीले जात आहे. या व्यवसायाकडे आकर्षित होऊन डिमॅट खातेही उघडले जात आहे. मात्र काही जणांना शेअर बाजाराची  माहिती नसल्यामुळे कामकाज करणे शक्य होत नाही. मात्र आता याची चिंता करण्याची गरज नाही. या लेखातून आपल्याला शेअर बाजाराविषयी आवश्यक ती माहिती दिली जात आहे. चला तर मग समजून घेऊया, शेअर बाजाराविषीयी तेही साध्या आणि सोप्या भाषेत..! 
 

असा करा शुभारंभ..! 
व्यवसाय सुरु करण्याआधी पूर्वतयारी करावी लागते. तसेच शेअर बाजारात काम करण्यासाठी सुद्धा पूर्व तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे डी-मॅट खाते, ट्रेडिंग खाते आणि एक बँक खाते असणे आवश्यक आहे. डी-मॅट शब्दाचा अर्थ डिमटेरिअलाईझ्ड खाते असा होतो. म्हणजे खरेदी केलेले शेअर या खात्यात डिजिटल स्वरूपात साठवले जातात. ही शेअरसाठीची डिजिटल तिजोरीच आहे असं समजायला काहीच हरकत नाही. हे खाते  ऑनलाईन प्रक्रियेनंतर सुरू करता येते. सेबीकडून मान्यताकृत संस्थांना डिमॅट खात्याची सेवा पुरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या संस्थांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा सोप्या भाषेत डीपी संस्था असेही म्हणतात. भारतात स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक यासारख्या सरकारी आणि  खाजगी बँकांमध्येही डीमॅट खाते उघडता येते. त्याचबरोर शेअर खान, ऐनजील, झिरोधा, अप स्टॉक अशा स्टॉक ब्रोकर संस्थाही ही सुविधा पुरवतात. 

डीमॅट आणि ट्रेडिंग खाते 
डीमॅट बरोबरच एक ट्रेडिंग खातेही गरजेचे आहे. डीमॅट आणि ट्रेडिंग ही एकमेकांना पूरक खाती आहेत. ही दोन्ही खाती असल्याशिवाय शेअरची खरेदी-विक्री करता येत नाही. या खात्याच्या माध्यमातून बाँबे स्टॉक एक्सचेंज किंवा राष्ट्रीय शेअरमार्फत विविध नामांकित कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करता येते. याव्यतिरिक्त डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याला जोडलेले एक बँक खातेही आवश्यक आहे. या बँक खात्यातून पैसे ट्रेडिंग खात्यात वळते होतात. शेअर विकल्यानंतर  याच खात्यात पैसे जमाही होतात. अलीकडे बहुतेक भारतीय बँका डीमॅट, ट्रेडिंग आणि बचत खाते, अशी एकाच खात्यात तिहेरी सोय उपलबद्ध करून  देतात. अशा खात्यांना थ्री-इन-वन खाते म्हणतात. 

डिमॅटसाठी आवश्यक कागदपत्रे 
डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचा रद्द केलेला धनादेश, राहण्याचा पत्ता प्रमाणित करणारे एखादे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा (आयकर प्रमाणपत्र किंवा पेमेंट स्लिप), पासपोर्ट आकाराचे फोटो डीपी संस्थेला सादर करावी लागतात. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आपले डिमॅट खाते उघडण्यात येते. 

शेअर बाजाराचे दोन प्रकार
डिमॅट खाते उघडल्यानंतर खरी कामाला सुरुवात होते. शेअर बाजाराचे दोन प्रकार आहेत. प्राथमिक शेअर बाजार आणि दुय्यम शेअर बाजार. आपण सर्वसाधारणपणे जी गुंतवणूक करतो ती दुय्यम बाजारातच करतो. इंग्रजीत याला सेकंडरी मार्केट असेही म्हणतात. एखाद्या कंपनीच्या शेअरची सर्वप्रथम नोंदणी ही प्राथमिक बाजारात होत असते. तेथून तो शेअर सेकंडरी मार्केटमध्ये खुला करण्यात येतो. पण, बाजारात नव्याने येणाऱ्या कंपनीचे शेअर्स इनिशियल पब्लिक ऑफर किंवा आयपीओद्वारे डिमॅट खात्यात घेता येतात. या प्रक्रियेला प्रायमरी मार्केटमधून खरेदी करणे असे म्हणतात. 

माहिती नसल्यानेच भीती..! 
शेअर बाजाराच्या कामकाजाची माहिती नसल्याने आणि चुकीचा व्यवहार करणाऱ्या लोकांकडून चुकीची माहिती मिळाल्याने शेअर बाजारात लोक कामकाज करताना घाबरतात. योग्य पद्धतीने, व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून कामकाज केल्यास शेअर बाजारातुन बौद्धिक श्रमाने भरघोस उत्पन्न काढणे शक्य होते. जगभरातल्या परकीय गुंतवणूकदार संस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदार संस्था शेअर बाजारात मोठ्या जोमाने कामकाज करताना दिसतात;  मात्र, आपल्या देशातील अनेक लोकांना शेअर बाजारातल्या गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे किंवा तेवढा धोका पत्करण्याची तयारी नसल्यामुळे या गुंतवणुकीपासून दूरच राहणे पसंद केले जाते. उपलब्ध आकडेवारीनुसार 130 अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात फक्त 2 कोटी 32 लाख डीमॅट अकाऊंटधारक आहेत. यातल्याही लाखांहून जास्त खात्यांमध्ये वर्षभरात काहीही खरेदी-विक्री केली जात नाही. यातच आपला देश शेअर बाजाराविषयी साक्षर नसल्याचे स्पष्ट होते. चला तर आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात असलेल्या काही प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. 

फायदा किती व कसा..? 
शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे म्हणजे काही कंपन्यांचे शेअर विकत घेणे. विकत घेतलेल्या कंपन्यांचे शेअर वर चढले तर थेट याचा फायदा मिळतो. याला प्रॉफिट असे म्हणतात. याशिवाय प्रत्येक तीन महिन्यानंतर कंपनी आपल्या गुंतवणुकीवर लाभांशही देत असते. थोडक्यात आपल्या डिमॅट खात्यात एखाद्या कंपनीचे १०० शेअर्स असतील तर आपण कंपनीत तेवढ्या हिश्श्याचे मालक असतो. बँकेतून मिळणार फायदा हा व्याज म्हणून दिला जातॊ आणि तो ३ ते ८ टक्के असू शकतो, आणि ही  टक्केवारी वार्षिक असते. मात्र शेअर्सवर होणारा फायदा यावर कुठलीही मर्यादा नसते. अगदी २० पासून तर कितीही म्हणजे ५००, १००० पर्यंतही प्रॉफिट मिळू शकते. गुंतवणुकीचा कालावधी जेवढा मोठा असेल तेवढे प्रॉफिट अधिक असू शकते.  

पैसे कुठे आणि कसे गुतववावे..?
शेअर बाजारात काम करण्याची तयारी झाली कि पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो तो कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची..? हा निर्णय अर्थातच अनुभवाने आणि अभ्यासपूर्वक घ्यावा लागतो.  महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक समजून घेता आला पाहिजे. ट्रेडिंग म्हणजे अल्प मुदतीचा कालावधी..! अगदी एका दिवसापासून तर आठवड्यासाठी एखाद्या शेअरची केलेली खरेदी-विक्री..! यामध्ये मोठा नफा मिळण्याची शक्यता असली तरी जोखीमही तितकीच असते. शेअर्समधील गुंतवणूक म्हणजे किमान सहा महिने ते 1-3 वर्षांची असायला हवी. दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते. शेअर्सची निवड करताना कंपनीची कामगिरी, सेबीने दिलेले रेटिंग, टेक्निकल आणि फंडामेंटल विचारात घेणे गरजेचे असते. याठिकाणी विश्वासू तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घायला हवे. 

पोर्टफोलिओ म्हणजे काय?
पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्याकडे असलेले शेअर्स, त्याची खरेदीची किंमत, बाजार भावाने असलेली किंमत यांचा एकत्र मांडलेला लेखाजोखा. चांगल्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या कंपनीच्या शेअर्सबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक असणेही महत्त्वाचे आहे. याला डायव्हर्सिफाईड किंवा विविधांगी गुंतवणूक असलेला पोर्टफोलिओ असे  म्हणतात. त्यातून जोखीम कमी होऊन प्रॉफिट वाढत राहते. 

खरेदी-विक्रीसाठी योग्य वेळ 
शेअर्समध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली? किती काळ गुंतवणूक ठेवावी? हे ठरवणे खूपच महत्वाचे आहे. सध्या शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी सव्वा नऊ ते साडे तीनपर्यंत सुरू असतो. या कालावधीत शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार  पार पडले जातात. बाजारात जर खरेदीचे वातावरण असेल तर निर्देशांक वर चढतो. आणि विक्रीचे  वातावरण असेल तर निर्देशांक खाली येतो. अशी आवर्तने शेअर बाजारात अव्याहत सुरूच असतात. अशावेळी शेअरचा भाव खाली आल्याची वेळ साधून खरेदी करणे आणि भाव उंचीवर असताना विक्री करणे ही रणनीती नेहमीच फायद्याची ठरते. 

गुंतवणूक शिस्तबद्ध असावी 
शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी अल्प मुदतीचा म्हणजे आज शेअर खरेदी करून आजच विकण्याचा किंवा 'बाय टुडे, सेल टुमॉरो' असा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र, हा पर्याय खूपच जोखमीचा आहे. शेअर्समधल्या गुंतवणुकीच्या कालावधीसाठी तीन महिने, सहा महिने, एक ते तीन वर्षे असे काही गट पाडण्यात आले आहेत. एक वर्षापेक्षा कमी गुंतवणूक ही अल्प मुदतीची समजली जाते. तर एक वर्षापासून पुढे ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक असते. त्यानुसार, शेअर्स विकून मिळणाऱ्या नफ्यावर कर आकारला जातो. गुंतवणूक नियमित आणि शिस्तबद्ध असेल तर तिचा फायदा अधिक होतो. 

शेअर बाजार सुरक्षित आहे का..?
शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणार्यांचा पहिला प्रश्न म्हणजे शेअर बाजार सुरक्षित आहे का?  एक तर या गुंतवणुकीत असलेली जोखीम आणि दुसरे म्हणजे कंपनी बुडाली तर आपले पैसे बुडण्याची भीती. असे एकना अनेक प्रश्न उभे राहता, योग्य उत्तर मिळत नाही, आणि म्हणूनच सर्वसामान्य शेअर बाजारात काम करण्याची इच्छा, भांडवल असूनही काम करू शकत नाही. चला तर आज आपण यावर स्पष्ट आणि सविस्तर उत्तर समजून घेऊया. भारतीय अर्थव्यवस्थेवरचा जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्यामुळे देशातल्या बँका आणि म्युच्युअल फंडांबरोबरच परकीय गुंतवणूकदार संस्थाही भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. याची परिणिती म्हणून शेअर बाजार निर्देशांकही वर जात आहे. गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी शेअर बाजारावर सेबीचे नियंत्रण असते. गुंतवणूकदारांच्या जनजागृतीसाठी मार्गदर्शकपर व्याख्यानेही आयोजित करण्यात येतात. एखाद्या व्यवहाराविषयी गुंतवणूकदार म्हणून तक्रार असेल तर त्याची दादही सेबीकडे मागता येते. थोडक्यात सांगायचे झाल्यास जगातील सर्वात पारदर्शक व्यवसाय असेल तर तो शेअर बाजारच म्हणावा लागेल; मात्र तो व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून असावा. सट्टेबाज वृत्ती मानसिक आणि आर्थिक नुकसानदायी ठरू शकते. 

गुंतवणुकीवर कर लागतो का?
शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचे अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीत असे दोन भाग पाडले जातात. एक वर्षांपेक्षा कमी मुदतीची गुंतवणूक ही अल्प मुदतीची असते. तर एक वर्षांपुढची गुंतवणूक ही दीर्घ. शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरचा कर हा मुदतीवर अवलंबून असतो. आयपीओमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अल्पमुदतीत मिळवलेला नफा हा करमुक्त असतो. तर 1-3 वर्षांपर्यंत शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा  1 लाखांपर्यंतचा नफाही करमुक्त असतो. अल्पमुदतीत म्हणजे एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या 1 लाखापेक्षा वरील नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून सरसकट 15% आयकर आकारला जातो. तर दीर्घ मुदतीच्या नफ्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणून 10 टक्के कर आकारला जातो. आयकर विवरणपत्र भरताना आर्थिक वर्षात शेअर बाजारातून कमावलेला नफा जाहीर करणे  बंधनकारक आहे. आयकर विवरणपत्र भरताना मागच्या तीन वर्षांत केलेले व्यवहार गृहित धरता येतात. म्हणजे गेल्यावर्षी शेअर बाजारात तोटा झाला असेल तर आताच्या वर्षात झालेल्या नफ्यातून मागच्या वर्षाचा तोटा वजा करून उरलेल्या नफ्यावर कर भरता येतो. ही तरतूद तीन वर्षांपर्यंतच लागू आहे. मित्रानो, आता नक्कीच आपल्याला शेअर बाजार समजलेला असेल. आणि येथे काम करण्याची तयारीही झाली असेल. हा लेख इतरांपर्यंतही पोहोचवा जेणे करून प्रत्येक जण शेअर बाजारात साक्षर होत आपले आर्थिक उत्पन्न वाढवू शकतील.

- कैलास एन. हिरोडकर 
संपादक : एचके ब्लॉग 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए

लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल अभ्यास करत खात्री करून घ्यावी. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

लोक काय म्हणतील..?

मुझे छू रही हैं..!

के.जी.एफ. : चॅप्टर 2

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

विचारांना समजून घेताना

फॉर्म्युला प्रॉफिट बुकिंगचा..!