विस्कटलेले मित्र अन् विस्कटलेले गाव


एचके लर्निग अँड एनएए
शहरात स्थाईक झालेले बरेच जन, ज्यांनी आज तिशी किंवा चाळिशी ओलांडली असेल, त्यांना त्यांचं गाव म्हणजे सतत आकर्षित करणारी आठवण बनलेली असेल. तसच काहीस माझं , आणि त्याला कारणही तसच. जवळ जवळ 20 वर्षानंतर माझ्या गावी जाण्याचा योग. तेथील मातीचे रस्ते, गाई-म्हशीचे वाडे, गावाच्या वेशिपासून शेतात जाणारी वाट, गावात प्रवेश करताना स्वागतास उत्सुक असलेली सूनी विहीर, गावा बाहेर रचलेले लाकडाचे ढीग, शाळेच्या मैदानात शेवटी एका कोपऱ्यात बाबुंचे डौलदार झाड, आणि त्याखाली आम्हा मित्रांची बैठक, गावाच्या मध्यभागी असलेले राम मंदिर, तेथेच असलेली मराठी शाळा, आणि मुक्तपणे पसरलेल्या निंबाच्या झाडाखाली असलेली हरिब्वा यांची छोटीशी टपरी अस सर्व चित्र डोळ्यासमोर राहून राहून येतय. 

मला आठवत तेव्हा मी 6 वर्षाचा असेन. आई, बाबा इतरांच्या शेतात दिवसभर काम करत असत. ते आता कळत, पण तेव्हा जगण्यासाठी काम करावं लागत अस काही माहीत नव्हतच. पहाट झाली, आंघोळ केली की, गावा मधील गल्ल्या गल्ल्यांमध्ये भटकंती असायची. तेव्हा वेळ बिळ अशी काही भानगड नसायची. भूक लागली की घराची वाट दिसायची. मग काय, रस्त्यात दबा धरून घट्ट मातीत बसलेली दगड, शोधून शोधून त्यांना पायांनी तुडवत, घर गाठण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यातही रस्त्यात एखाद्या गाई - म्हशीच्या गोठ्यात कुत्रीची लहान लहान नवजात पिले दिसली की, मग पुढील कितेक तास त्यांच्या सोबत जातील ते सांगणे अवघडच. जेव्हा पोटातून भूक लागली असा पुकारा येत नाही तोवर हलने अवघड. मग काय, स्वारी कशी बशी कितीतरी वाजता घरासमोर येऊन थांबत असे. त्यावेळेस घडी बडी ही काही भानगडच नव्हती. कुडाच जेम तेम आठ ते दहा फुटाच ते घर. दरवाजा होता; पण मला आठवत, कडी उघडुन मी कधी आत गेलोच नाही. कारण कडी उघडायचे म्हणजे माझ्या सारखी दोन मुलं नक्कीच लागत होती. एकाला खाली उभ करून त्याच्या खांद्यावर बसून दरवाज्याची कडी उघडणे शक्य होत असे. रोज रोज खांद्यावर बसवून घेणारा कुठे शोधावा म्हणून काही उपाय ठरलेले असायचे. एक यशस्वी उपाय म्हणजे कुडाच्या काड्या बाजूला करून सरळ घरात प्रवेश होत असे. घरात जेवण असे पण ते वर खुंटीला किंवा घरात या टोकापासून तर त्या टोकापर्यंत बाबू लावलेला असे त्यावर असे. त्या बांबूचा वापर म्हणजे प्रतेकाची कपडे सुध्दा त्यावरच टांगली जायची. भाऊ तेव्हाचा नाही आठवत. हो ताई आठवते. ती पण आई सोबत शेतात जायची. कधी कधी घरी असली की माझी दिवाळी असे. एकदा आठवत बाबा आईला रागवून सांगत होते. ती भाषा आज खूप गोड वाटते ऐकायला. बाबा म्हणत होते की, "लतीले वावरात आणू नको, हा कुठीबी चालल्ला जातो." पुढे काही आठवत नाही. 

जेव्हा मी पाचवीत गेलो तेव्हा खूप काही कळायला लागल. आपण खूप गरीब आहोत. बाबा कुणाकडे तरी सालदार म्हणून काम करतात. आई रोज सर्व आवरून सावरून शेतात कामाला जात असते. भाऊ दोन वर्ग पुढे हायस्कूल मधे जातो, आणि केवळ आम्हा दोघं भावांसाठी व घराला हातभार लागावा म्हणून ताईने शाळा सोडून शेत हीच शाळा अशी तडजोड केलेली. तरी बालपण जस जगावं तसच जगलो आम्ही. घरात दारिद्र्य जरी असले तरी ज्यांच्याकडे आई, बाबा काम करायचे त्यांनी त्यांचे घर आमच्यासाठी कायम उघडे ठेवले. आम्ही राहायचो ते घर आपले की ज्यांच्या घरात संपूर्ण बालपण गेले ते घर आपले हा आजही प्रश्न पडतो. आजही कधी कुठल्या कामा निमित्त त्या परिवारातील माणस नाशिकला आली की हमखास भेटतात आणि मला तोच भास होतो पाचवीत असल्यासारखा. आजही ती नावं आठवली की, ते मायेने ओतप्रोत भरलेली चेहरे आठवतात. हे गाव गुजर समाजाचे त्यांची भाषाही गुजर. आम्ही सोनार, आम्ही घरी मराठी बोलायचो. पण बाबा सोडले तर आम्ही चौघे म्हणजे आई, ताई, भाऊ आणि मी गुजर भाषेतच बोलायचो. गावातील काही लोक सोडली तर आम्ही इतरांसाठी सोनार नसून गुजरच होतो. गुजरमध्ये बोय ही आजी असते. मग सुमन बोय, मिरा बोय ही दोन नाव आजही खूप आपलीशी वाटतात. आजही आठवतात ते दिवस जेव्हा ताईचे लग्न ठरले. इतरांसाठी कोडच पडल असेल की, लग्न घर कोणत. माधव पाटील, किसन पाटील आणि गंभीर पाटील या तीन घरांमधून ताईच्या लग्नाची सूत्र हलत होती. पवन देवालाही हेवा सुटावा त्या माणुसकीचा म्हणून काय ताईच्या लग्न भेटीला धावत आला आणि अवघा मांडव आभाळाच्या दिशेने झेप घेवू लागला. ताईची बिदाई आठवते. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले होते.

नाशिकला स्थाईक होऊन आज 30 वर्ष झाली असतील. पण गाव शब्द कानावर आला की, दापोराच समोर येत. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेले हे गाव. श्रीमंत गाव. केळीचे उत्पादन एवढे की, याच गावातील लोकांनी केला ग्रुप स्थापन करून स्वतः व्यवस्था करून घेतलीय. एवढ्या वर्षानंतर गावी जाण्याचा उत्साह होता. पण मनात खूप सारे प्रश्न पण होती. सर्व मित्र, ते वातावरण, असेल का तसे. अर्थात नसेलच कारण मित्र तर कामा निमित्त ठिकठिकाणी स्थाईक झाले आहेत. मग गावात नेमक काय आहे जाण्यासाठी. माझं बालपण केवळ एक आठवण बनुन राहीलय. गाव सोडलं तेव्हाच सर्व विस्कळीत झालं होत. दहावी पास झालो आणि नाशिकला शिकायला मिळत आहे म्हणून आनंदी होतो. तो आनंद वर्षभर राहिला सुध्दा, मात्र गावातील तो जिवंतपणा आजपर्यंत शहरात अनुभवता आला नाही. कोण जाणे गाव कसे असेल, मित्र असतील की, ते पण माझ्यासारखी गाव सोडून इतरत्र असतील. नया शेई म्हणजे आमचे हायस्कूल असेल का तसेच, शाळे शेजारी केळीचा बाग आणि बागेतील आंब्याचे झाड असेल का तसेच. अनंत प्रश्न वाऱ्यासारखी वाहत आहे अवती भवती. ताई गावाजवळच इच्छापुर गावात. बऱ्याचदा तेथे जान होत, पण दापोऱ्यात जायची हिंमत नाही होत. कारण म्हणजे, माझी मोजकीच मित्र आणि तेच खर माझं गाव होत. आता ती तेथे नाही प्रवीण गुलाई गावी, विवेक मलकापूरला, नितीन शहापूरात, जितू आता कुठे आहे माहीत नाही, आता तेथे आहेत माधव पाटील यांचे कुटुंब जे नाशिकला आले तरी भेटल्याशिवाय राहत नाही. तो बंध अजूनही टिकून आहे. तरी गाव सोडल्यावर ज्या मित्रांसाठी माझी गावाकडे धाव असायची, आता तीच मित्र गावात नसल्यामुळे गावाकडे जायची भीती वाटायला लागलीय. 

घर असो वा गाव, त्याच अस्तित्व आपली माणस असली तरच असते. नाहीतर सर्व काही शून्य असते. गाव बघून गावातील प्रतेक ठिकाणचा स्पर्श एक वेगळाच आनंद देऊन जाईल. पण ज्यांच्या सोबत ती ठिकाणे तासनतास बसून अनुभवली ते नाही पुन्हा अनुभवता येत. गावाला जाण्याचा आनंद तर आहेच पण विस्कटलेले मित्र त्याच काय करायचं. तो जिव्हाळा बरीच मित्र विसरली सुध्दा आहेत. जसा त्यांचा आवाज बदलल्ला, तसा चेहराही आणि विचारही. बालपण कधीच मागे टाकले त्यांनी आणि आता बोलण्यात मोठेपण. ते बालपणीचे तासनतास बोलने हरवलेय. मोठी माणस एकमेकांशी जसा संवाद साधतात तोच आणि तसाच संवाद सोमरून होतो. आणि त्या संवादामध्ये तो बालपणीचा मित्र मी शोधत बसतो. मनात जे भाव उत्पन्न होतात ते ठरवून होत नाही. ती भाव बंधनाची नैसर्गिक निर्मिती असते. गेल्या तीस वर्षात एक दोन मित्रांशी मोबाइलद्वारे बोलणं झालंही, मात्र तो बालपणीचा स्पर्श काही अनुभवता आला नाही. सर्वकाही काळाच्या ओघात लुप्त झालेय. मात्र मी अजूनही तोच पाचवीत असलेला. शोधत आहे पाचवीत असलेल्या त्या माझ्या मित्रांना. त्या सर्वांना सांगावस वाटत की, मान्य आहे आपण मोठी झालो, जबाबदाऱ्या वाढल्या, अवती भवती रक्ताची नाती, कामाचा व्याप, बदललेला मित्र परिवार हे सगळ बदललय. पण अंतर्मनात ते बालपण, ते निस्वार्थ जगणं, तासन् तास त्या बैल गाडीवर गप्पा मारण, निंबुच्या शेतात जाऊन निंबु तोडून विकायला जान, रात्रीची लपालपी, आंब्याच्या झाडावर बसून कैरीचा आस्वाद घेणं, ते चिंचेचं झाड, शेतात जाऊन काळया मातीने अंग माखून मग विहरीवरील पाण्यात उड्या मारण, शाळेच्या मैदानावर सायकली फिरवण, ते दिवसभर क्रिकेट खेळन, हिवाळ्यात सरपण चोरून शेकोटी करन, त्यात केळी आणि हरभरे भाजून मनसोक्त खात राहण हे सर्व नाही का आठवत रे?. एकदातरी त्या बाल जगाला भेट द्या, माझ्यासारखी कितेक मित्र वाट पाहताय, तेथे, त्याच ठिकाणी, त्याच अवस्थेत, चक्क आजही.

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक आहेत. 
 

आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!