फसवी सोंगं..!
शालेय शिक्षण घेत असताना नाशिक शहराचे अध्यात्मिक आकर्षण होतेच अन् आजही आहेच. 'प्रभु श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी’ या दैवी स्पर्श असलेल्या शब्दांनी साक्षात श्रीरामांचा भास व्हायचा..! कॉलेज लाईफ नाशिकमध्ये असणार हे जवळजवळ निश्चितच होतं. अखेर तो दिवस उजाडला, अन् गावातलं बालपण मनात साठवून पुढील शिक्षणासाठी नाशिकमध्ये स्थायिक झालो. ग्रामीण शालेय जिवण अन् शहरी महाविद्यालयातील जगणं यातील ताळमेळ बसवणं खूपच अवघड जात होतं. महाविद्यालयात स्वत:ला इतरांपेक्षा वेगळं भासवण्यासाठी बऱ्याच जणांचे फसवं सोंग घेऊन जगणं सुरू होतं अन् आजही सुरूच आहे. फसवं सोंग म्हणजे जे नाही ते असण्याचा भास निर्माण करणे. या फसव्या सोंगामुळे तरुण पिढी तेव्हाही वास्तविकतेपासून भरकटत होती अन् आजही भरकटतच आहे. संपूर्ण कॉलेज लाईफ संपलं, मात्र फसवं सोंग घेऊन कस जगता येतं, हे काही शिकता आलं नाही. मात्र, आज याची खंत नसून आत्मीक समाधानच आहे.
निस्वार्थपणा अन् संवेदनशीलतेची निवड
भोवताली वावरणारी, विषारी अन् अघुरी सोंग घेऊन जगणारी माणसं पदोपदी पाहायला मिळतात. हीच माणसं स्वार्थासाठी आपल्या माणसांचा गळा कापतात. असंवेदनशीलतेची कातडी मनावर पांघरून मानसिक त्रास देतात, फसवतात अन् आसुरी आनंद मिळवतात. असली अघुरी सोंगं इतरांसह स्वत:चं आयुष्यही अंधकारमय करत असतात, याची जाणीवही यांना नसते. याला दुर्दैवच म्हणावं लागेल. आपण मात्र असली अघुरी सोंगं आयुष्यात कधीच घ्यायची नाही, असे मनस्वी प्रण करत, निस्वार्थ अन् संवेदनशीलतेचा मार्ग निवडला. अगदी नोकरी मिळवतानाही फसवं सोंग घेता आलं नाही. म्हणून मुलाखतीतच मला बऱ्याच ठिकाणी नकार देण्यात आला. अनेकदा तर केवळ शिफारस नाही, स्लम एरियामध्ये वास्तव्य आहे, ज्या परिसरात वास्तव्यास आहे ती वस्ती बरोबर नाही, अशी कारणं नंतर एैकालाही मिळाली. खरेपणा अन् प्रामाणिकपणाला परमेश्वराचा आशिर्वाद असतो असं म्हणतात, अन् ते खरंही आहे. उशीरा का होईना, या आशिर्वादाचा लाभ मलाही मिळाला, अन् फसवं सोंग घेऊन जगण्याची आवश्यकता नसते याची पुन्हा जाणीव झाली.
आईत परमेश्वराचा भास..!
जवळजवळ २५ वर्षाचा दिर्घ प्रवास या देवभूमीत पूर्ण होतोय. याप्रवासात सुख-दु:खांचे थांबेही अनुभवले. गर्दीत जसं आपोआप लोटलं जातं तसंच माझं आयुष्यही लोटलं जातयं, हे नाशिकला आल्यापासून तेव्हाही जाणवत होतं अन् आजही जाणवतयं. जशी कृती तसा परिणाम, या सूत्रात संपूर्ण आयुष्य बांधले जाते, याची क्षणोक्षणी जाणीव..!, म्हणूनच जगण्याचा सद्मार्ग निवडला गेला असावा. आई-बाबांचे संस्कार, स्वावलंबत्व अन् स्वाभीमान जगण्यासाठी खूपकाही शिकवून गेले. गावात होतो तेव्हा बाबा डोळ्यांनी दिसत नव्हते, कारण माझी पहाट ते शेतात गेल्यानंतर व्हायची, अन् रात्र ते यायच्या आधी. गावात बाबांचा सहवास फार कमी लाभला. आईच्या सहवासात परमेश्वराचा भास होता. निरक्षर हाेती, मात्र सर्व आरत्या तोंडपाठ होत्या. तिच्या अंतर्मनात मायेचा निर्झर झराच वाहत होता. गाव सोडलं तो क्षण आजही स्मरणात आहे. माझं करिअर घडणार म्हणून आनंदाचे अश्रू आणि माझं बाळ माझ्यापासून दूरावणार म्हणून विरहाश्रूंचा मिलाफ मी तिच्या डोळ्यात पाहीलायं. आजही डोळे मिटल्यावर तो क्षण जिवंत असल्यासारखा समोर उभा राहतो. आजही जेव्हा-जेव्हा मन अस्थिर होतं तेव्हा-तेव्हा एकांतात तिच्या कुशीत घट्ट डोळे मिटून पडून राहावासं वाटतं. अन् आई तुझं लेकरू..., येडं गं कोकरू..., राणात फसलंय.., रस्ता चुकलंय, सांग मी काय करू..? असा निरागस प्रश्न विचारावासा वाटतो..!
दूरावल्याची व्यथा जिवघेणीच...!
आपली माणसं जेव्हा आपल्यात असतात, तोवर ते दुर्लक्षित असतात; त्यांची महती तेव्हाच कळते जेव्हा ते दिर्घ काळासाठी नजरेआड होतात. ती ओढ, हुरहूर मनाला बैचेन करणारी असते. नाशिकला असताना असले क्षण १० वर्षांत अनेकदा अनुभवले, मात्र आपल्या माणसांपासून दूर राहण्याची सवय काहीकेल्या लावता आली नाही. जगणं एक्कलकोंडं करता आलं नाही, याचे मनस्वी आज समाधानच आहे. एखादा अपवाद सोडला तर हवीहवीशी सर्वच माणसं आज जवळ असल्याचा आनंदही आहे. मनात एकच असहनशील वेदना ती म्हणजे आई-बाबा कायमचे सोडून गेल्याची. आपल्यावर माया करणारं माणूस दूरावल्याची व्यथा जीवघेणीच असते, याची जाणीव आई-बाबा कायमचे सोडून गेल्यावर झाली. अन् येथून परिस्थितीने शिकवलं इतरांच्या कल्याणासाठी फसवं सोंग घेऊन जगणं..! अंतर्मनाची घालमेल, अस्थिरता, कोंडवाडा, तगमग, गुदमरणं, सून्नपणा, मुर्छीतावस्था, हुरहूर, ओढ असल्या भावनांना फसव्या सोंगामुळेच लपवणं शक्य झालंय. विचारलेल्या प्रश्नांना अंतर्मनातील वेदना लपवून, सोपी उत्तरं देता येणही शक्य झालयं. जसजसा काळ सरत जातोयं तसतशी यात निपुणताही येतेयं. आता बाह्य मनं पार निब्बर झालंय...! मात्र अंतर्मन येडं-पिसं होऊन आजही आई-बाबांनाच शोधतय...! आता निष्ठूर बाह्य मनाला कुठचंही वादळ सहज अंतर्मनाकडून शमवून घेता येतयं. आपल्याच माणसांनी शाब्दीक धारदार तलवारीने रक्तबंबाळ केलेल्या मानावर सांडलेलं रक्तही पुसता येतंय. दु:ख अन् वेदना पचवण्याचं कौशल्य आई-बाबा जाता-जाता अप्रत्यक्षपणे शिकवून गेले. आता त्यांच्या विरहाचे हुंदके मनातच विरतात अन् अघुरी फसव्या सोंगांशी लढण्याच बळही देतात..!
जबाबदारीने शिकवली दुनियादारी
छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या पेलताना ठिकठिकाणी फसवं सोंग घ्यावं लागतं नाहीतर या दुनियादरीतून हद्दपार व्हावं लागतं याची जाणीव व्हायला लागली. कुणाचं कल्याण होत असेल तर फसवं सोंग घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र आपल्या कृतीमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर असले फसवे सोंग कधीच घ्यायचे नाही, असे मनस्वी ठरविले. आजवर या कौशल्याचा वापर भिती घालवणे, आत्मविश्वास वाढविणे, मन बळकट करणे, निराशा घालवणे अशा चांगल्या कामांसाठीच करत आहे. याचा मनस्वी आनंद अन् समाधानही आहे. इतरांच्या कल्याणासाठी आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी ‘एचके ब्लॉग’सारखं माध्यम हाताशी घेतलंय. रोज जगण्यातले नवनवी अनुभव मन टिपतंय अन् ‘एचके ब्लॉग’वर लिहिलं जातंय. बाबा असताना माझ्या यश-अपयशाचे साक्षीदार ते असत, त्यांचा शाबासकीचा अन् आधाराचा हात पाठीवर असे. आज मात्र एकच खंत ते सोबत नसल्याची. अचानकपणे आलेल्या जबाबदाऱ्यांनी दुनियादारी शिकवली, हे मात्र खरयं..!
कार्यालयांमधलं फसवं सोंग
विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये अनेकदा भेटीचा अन् प्रत्यक्ष काम करण्याच्या योग आला. त्यातून माणसं वाचण्याचं कौशल्यही शिकायला मिळालं. माणसं ओळखणं अन् निवडणंही सोपं झालं. त्या-त्या कार्यालयांमध्ये विविध प्रकारची सोंग घेऊन वावरणारी माणसं जवळून पाहता अन् अनुभवताही आली. या अनुभवातूनच असूरी वृत्तीची सोंगं घेऊन वावरणाऱ्या माणसांपासून अंतर ठेवून जगता आलं. संपूर्ण आयुष्य एका ठराविक कुंपणातच घिरट्या घालत असतं. घर, भोवतालचा परिसर अन् आपले कामाचे कार्यालय म्हणजे आयुष्याचे रणांगणच. याच ठिकाणी दगा-फटका होण्याची दाट शक्यता असते. कार्यालयांमध्ये आपल्या समोर आपली स्तुती करणारे, आपल्या पाठीमागे आपलीच बदनामीही मनसाेक्तपणे करतात, याचा अनुभवही घेतला अन् त्याचा दुष्पपरिणाही भोगला. काहींचा जन्मच कुरापती करण्यासाठी झाला असावा, याची खात्रीही याकाळात पटली. या असूरी वृत्तीतून कुणाचे आयुष्य देशोधडीला लागणार, याचे त्यांना काहीही घेणे-देणे नसते. गॉसिपच्या नावाने कुणाविषयी काहीही बेछूट आरोप करणं, हा यांचा घाणेरडा धंदाच असतो. म्हणून आपणही अशा विषारी वृत्तीच्या फसव्या सोंगापासून स्वत:चा बचाव कराल हीच मनस्वी प्रामाणिक अपेक्षा..!
सजग व्हा..! सावध राहा..!
असूरी वृत्तीची माणसं विषापेक्षाही घातक असतात, याची जाणीव स्वत: अनुभव घेतल्याशिवाय होत नाही, हेही तेवढेच खरे. बरं, ही माणसं कुरापती करण्यात ऐवढी तरबेज असतात की, यांना ओळखणं अवघडच असतं. समोर असताना हेच आपले काळजीवाहू, हितचिंतक आहेत अशी आपली पक्की खात्री पटते, अन् त्यांच्या विषारी वृत्तीचा फास आपल्या भोवती घट्ट होत जातो. म्हणून सजग व्हा..! सावध राहा..! माणसं वाचा अन् ओळखा..! या लेखाच्या माध्यमातून आजवर आयुष्य जगताना जे-जे अनुभव पदरी आले ते-ते प्रमाणिकपणे टिपण्याचा प्रयत्न केलायं. उद्देश ऐवढाच की, व्यवहारिक जगात वावरताना प्रत्येकाला डोळसपणे जगता यावं, विषारी अन् असूरी वृत्तीच्या फसव्या सोंगांपासून सावध राहता यावं..! हीच अपेक्षा करत, या लेखाचा येथेच समारोप करूया, अन् पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आपल्या आवडत्या ‘एचके ब्लॉग’ वर..! धन्यवाद...!
लेखक : कैलास एन. हिरोडकर
लेखक ‘एचके लर्निंग ॲण्ड एनएए’चे संचालक असून शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक आहेत.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा