मार्ग कुटुंब सुख-समृध्दीचा..!
कौटुंबिक सुख-समृध्दीसाठी कुटुंबप्रमुखाची भूमिका महत्वाची मानली जाते. म्हणूनच कुटुंबप्रमुख कुटुंबाचा आधारस्तंभ अन् आदर्श असतो. आजच्या आधुनिक काळात ही जबाबदारी स्त्री किंवा पुरुष कुणावरही असू शकते. सर्वप्रथम यांनीच शिस्त अन् वर्तवणूकीची आदर्श चौकट आखून घ्यावी. उंबरठ्याच्या आत अन् बाहेर भूमिका बदलवून घ्यावी. बाहेर वावरताना व्यवहारीकता अन् घरात वावरताना भावनीकता कशी टिकवून ठेवता येईल, हे ठरवुन घ्यावे. ही अदलाबदलाची भूमिका जमायलाच हवी, अन्यथा घरात तनावाचे उष्ण वारे वाहत राहतील, हे विसरता कामा नये. घरातील लहान, मोठे, वृध्द यांच्यासोबत आपुलकी वाढवावी, त्यांच्या सोबत वावरताना त्यांच्यासारखेच व्हावे. बाहेर वावरताना कसलाही, कोणताही तान सोबत घरी आणू नये. चुकून आलाच तर घराबाहेर अदृश्य खुंटीवर तो टांगून ठेवावा अन् मगच घरात प्रवेश करावा, म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाचा चेहेरा वाचत त्यांच्या भाव-भावना समजून घेणे शक्य होईल. असे केल्याने घरात आनंदाचे वातावरणही टिकवून ठेवता येईल, अन् हाच मार्ग कुटुंब सुख-समृध्दीचा असेल. ही झाली कुटुंबप्रमुखाची बाजू. आता जेवढी जबाबदारी कुटुंबप्रमुखाची असते तेवढीच जबाबदारी घरातील प्रत्येक सदस्याचीही असायला हवी. 'हम साथ साथ है..! ही केवळ दिखावट नसावी. प्रत्येकानी प्रत्येकाला समजून घ्यावे. असे केल्यास कुटुंबात गैरसमजुतीचा विकार होणार नाही. कारण हा विकार संसर्गजन्य मानला जातो, ज्यातून पुढे संशयवृत्ती हा महाविकार होतो. हाच विकार कुटुंब उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतो..! म्हणून उंबरठ्याच्या आत काय घेऊन यावे आणि उंबरठ्याच्या बाहेर काय घेऊन जावे हे ठरवायलाच हवे.
पती-पत्नीत भाव हवे मैत्रीचे...!
पती-पत्नीच्या नात्यात मैत्रीचे भाव असायलाच हवे. मैत्री म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेलं निरागस नातं. आयुष्याच्या रंगमंचावर संसार नावाच नाटक रंगवताना या दोघांना भूमिका बदलवता आलीच पाहिजे. मनात स्वतंत्र हृदयस्पर्शी भावविश्व निर्माण करता आलेच पाहिजे. या भावविश्वातली एकरूपता म्हणजेच ‘तू मी अन् मी तू’. घरात सुख-समृध्दी नसल्याचे एक कारण म्हणजे पती-पत्नी मध्ये होणारी ‘तू-तू, मै-मै’. यामुळे दूरावा वाढून आपणच एकमेकांचे जिवलग आहोत याचा यांना विसर पडत जातो. ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना..! याची जाणीव असतानाही तुच माझा/माझी सखा/सखी लक्षात न येणं सर्वात मोठी शोकांतीकाच म्हणावी लागेल. म्हणून सुख-समृध्दीसाठी या दोघांनी हे निस्वार्थ नातं निरागसपणे जपले पाहिजे.
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे,
जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे!
असंच प्रत्येक पती-पत्नीने मैत्री भाव जपत आयुष्य सुख-समृध्द करायला हवे.
अपेक्षाभंगातूनच बिघडतात नाती
निरागस, निस्वार्थ आयुष्य जगण्यासाठी अपेक्षा नावाचा मोह टाळायला हवा, कारण अपेक्षाभंगातूनच नाती बिघडतात. कर्तव्यात कसूर नकोच, मात्र कर्तव्य पार पाडताना अपेक्षांचा मोह नक्कीच टाळता आला पाहिजे. बाहेरून घरी येताना कुणी कसे वागावे हे आपणच ठरवायला नको. कारण आपण ठरवल्याप्रमाणे जर घडले नाही, तर अपेक्षाभांगाची भावना निर्माण होऊन त्या व्यक्तीविषयी तिरस्कार वाढत जातो. मग ती व्यक्ती आई, बाबा, पत्नी, मुले कुणीही असू शकते. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांनी कुटुंब प्रमुखाने असेच वागायला हवे, अशी अपेक्षा करू नये. मुळात अपेक्षाच करू नये. प्रत्येकाचा प्रत्येकावर प्रचंड विश्वास असायला हवा. अपेक्षा करणे हा मानवी स्वभावच आहे. मात्र यावर नियंत्रण असायलाच हवे. मुलं अभ्यास करत असावे, आई-बाबा, पत्नी मस्त गप्पा मारत बसलेले हवे, अशी अपेक्षा करत आपण घरी पोहोचतो अन् चित्र अगदी उलटे दिसते. मग मात्र आपली चीडचीड वाढून आदडाआपट सुरू होते. त्यातच मुलांवर हातही उगारला जातो. हे असे का घडते..? कारण एकच, ते म्हणजे अपेक्षाभंग..! याउलट अपेक्षा न ठेवता घरात स्मितहास्य करत, आपणही घरात आनंद पेरु शकतो. मात्र हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपण स्वतः या अपेक्षा नावाच्या विकरापासून मुक्त असू..! शेवटी घराला मंदिर बनवायचे का आखाडा, हे आपल्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या हातात आहे. यावर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.
हॉलमध्ये वाद नको संवाद असावा
घरातील हॉलला संवाद मंचच म्हणायला हवे. बऱ्याच घरात हाच मंच वाद मंच होताना दिसतो. या ठिकाणी एकत्रित येताच एकमेकांना हिनवणे, दुःखी करणे, अपमानित करणे यातच धन्यता मानली जाते. याचा दुष्परिणाम असा होतो की, या हॉल मध्ये गेटटुगेदर होणे थांबते..! एकमेकांत रमण्याऐवजी स्मार्टफोनमध्ये रमने पसंत केले जाते. याला जबाबदार घरातील विविध मनोविकारांनी पीडित सदस्यच असतात. यांनी प्रेम, माया, आपुलकी, निस्वार्थपणा, निरागसता अंगिकारून मनोविकार दूर करायला हवा. घराला घरपण द्यायला हवे. काही जण तर निंदा हा विकार घेऊनच जगत असतात. जिथे संधी मिळेल तिथे निंदा करायला पुढेच असतात. निंदा कुणाची करायची हेही आधीपासूनच ठरलेले असते. यांच्यात लवकर सुधारणा होणे जवळजवळ अशक्यच असते; मात्र कुटुंबातील बाकी सदस्यांनी यांना दुर्लक्षित केल्यास यांचा विकार नक्कीच बरा करता येतो. अशांना निंदा करताना प्रतिसादाची आवश्यकता असते. अन्यथा यांचा निंदा करण्याचा जोर ओसरतो. म्हणून यांना प्रतिसाद देणेच थांबवायला हवे. हॉलमध्ये अटीशर्ती हव्यात. त्या म्हणजे येथे केवळ अन् केवळ संवादच असायला हवा. बघा पटतय का..? अनुकरण करत सुख-समृद्धीचा मार्ग नक्कीच सापडेल.
- कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Blog : https://hklearning-naa.blogspot.com


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा