आयपीओ म्हणजे काय?
आयपीओ म्हणजे ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एक खाजगी कंपनी सामान्य लोकांना आपले शेअर्स ऑफर करून, सर्वांसाठी कंपनी सार्वजनिक करते. कंपनी आपले शेअर्स जनतेला देते आणि त्याबदल्यात निधी/फंड उभारते. प्रायमरी मार्केटमध्ये (प्राथमिक बाजार) आयपीओद्वारे गुंतवणूक करणे शक्य होते. आयपीओचा फुल फॉर्म इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) असा आहे. थोडक्यात जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स पहिल्यांदा जनतेला ऑफर करते, तेव्हा त्याला आयपीओ असे म्हणतात.
आयपीओ का आणला जातो?
नक्कीच हा प्रश्न पडणे साहजिकच आहे, की आयपीओ का आणला जातो? किंवा सार्वजनिक होऊन कंपनीचा काय फायदा होतो? तर याविषयी आपण थोडक्यात पण सविस्तर जाणून घेऊया. कंपनीला आयपीओ आणण्याची किंवा सार्वजनिक होण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील.
भांडवल उभारण्यासाठी : जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स आयपीओद्वारे जनतेला ऑफर करते, तेव्हा कंपनीला मोठया प्रमाणात फंड म्हणजेच निधी उभारणे शक्य होते, कंपनी या निधीचा वापर विकासासाठी करते. कंपनीच्या विकासासह यात शेअर्सधारकांचाही आर्थिक फायदा होतो.
प्रतिष्ठा : जेव्हा एखादी कंपनी आपला आयपीओ बाजारात आणते, तेव्हा ही बाब कंपनीसाठी प्रतिष्टेची मानली जाते. शेअर बाजारात अशा सूचीबद्ध कंपन्या अधिक चांगल्या मानल्या जातात आणि त्यांची बाजारातील प्रतिष्ठाही चांगली आहे. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करण्यास सहज तयार असतात.
सेबीची भूमिका
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड अर्थात सेबी (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांसाठी सरकारी नियामक आहे. सेबी आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडते. सेबीला सर्व प्रकारची माहिती देणे या कंपन्यांना बंधनकारक असते . ही एक प्रकारची अनिवार्य अटच असते. एवढेच नव्हे तर, आयपीओ आणल्यानंतर सेबी कंपनीची चौकशी देखील करते. या चौकशीत काही चुक आढळल्यास कंपनीवर सेबी दंडात्मक कारवाई करते.
आयपीओ आणि अर्थव्यवस्था
जेव्हा बाजारात अनेक आयपीओ येत असतात, तेव्हा याचा अर्थ असाही होतो की, शेअर बाजाराची किंवा अर्थव्यवस्थेची स्थिती ठीकठाक आहे. जेव्हा कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट येते, तेव्हा आयपीओची लिस्टिंग थांबवली जाते, किंवा स्वतःहून कंपनी आयपीओची प्रक्रिया टाळते. कारण मंदीमध्ये बाजार आधीच अंडरव्हॅलू असतो. परंतु असे असूनही, जर एकापाठोपाठ अनेक आयपीओ बाजारात येत असतील, तर अंदाज लावला जातो की, अर्थव्यवस्थेची स्थिती लवकरच सुधारण्याच्या मार्गावर आहे. यावरून शेअर बाजारात गुंतवणूकदार आश्वस्त होऊन गुंतवणूक करण्यास सज्ज होत असतात.
आयपीओचे प्रकार
किमती निश्चित करण्यासाठी आयपीओचे दोन प्रकारांमध्ये विभाजन केले जाते. फिक्स प्राईस इश्यू किंवा फिक्स प्राईस आईपीओ, बुक बिल्डिंग इश्यू किंवा बुक बिल्डिंग आईपीओ असे हे दोन प्रकार आहेत. फिक्स प्राईस आयपीओ म्हणजे, आयपीओ आणणारी कंपनी आयपीओ जारी करण्यापूर्वी इन्वेस्टन्ट बँकेसोबत आयपीओ किंमतीवर चर्चा करते. इन्व्हेस्टमेंट बँकेबरोबरच्या बैठकीत कंपनी आयपीओची किंमत ठरवते. त्या निश्चित किमतीत कोणताही गुंतवणूकदार आयपीओची सदस्यता घेऊ शकतो. यालाच फिक्स प्राईस आयपीओ म्हणतात. दुसरा प्रकार बुक बिल्डिंग आयपीओ, यामध्ये कंपनी इन्व्हेस्टमेंट बँकेसह आयपीओचा प्राइस बँड ठरवते. आयपीओचा प्राइस बँड ठरवल्यानंतरच तो जारी केला जातो. बुक बिल्डिंग आयपीओच्या प्राइस बँडमध्ये दोन प्रकार आहेत, जर आयपीओची किंमत प्राइस बँडमध्ये कमी असेल तर त्याला फ्लोअर प्राईस असे म्हणतात. जर आयपीओची किंमत जास्त असेल तर त्याला कॅप प्राईस म्हणतात. कॅप प्राईस आणि फ्लोअर प्राईसमध्ये २०% फरक ठेवला जाऊ शकतो.
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक आहेत.
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक आहेत.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा