वेळीच सुधारणा गरजेची

एचके लर्निंग अँड एनएए :
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनातील बदल म्हणजे महाक्रांतीच म्हणावे लागेल. पहाटे उठल्यापासून तर झोपेपर्यंत तंत्रज्ञानाच वापर होतो. अनेक सुविधा मानवी आयुष्यात आल्या, मात्र याबदल्यात चांगल्या सवयी गमवाव्या लागल्या, यावर प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. संपूर्ण मानवजात तंत्रज्ञानाच्या माया जाळ्यात अडकत आहे. चाकाचा शोध लागला तर चालणे बंद झाले. टीव्हीमुळे एकमेकांमधील संवाद कमी झाला. व्हिडीओ गेम आल्याने मैदानी खेळ बंद झाले. इंधनावर पळणाऱ्या गाड्या आल्या तर सायकलचा वापर बंद झाला. इथपर्यंत ठीक होत; मात्र विसाव्या शतकाने मानवी जीवनावर जणू सर्वात मोठा हल्ला चढवला. तो हल्ला म्हणजे स्मार्टफोनचा..! हो..!, या स्मार्टफोनमुळे उरलेसुरलेले माणूसपणही संपुष्टात आले. या बर्बादीला तंत्रज्ञान मुळीच जबाबदार नाही. याला जबाबदार आहे स्वतः मानवजात. तंत्रज्ञानाचा अति आणि चुकीचा वापर जगाला विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहे, याला कुणाचेही दुमत नसावे. तंत्रज्ञान आले तर देशांनी विनाशकारी शस्त्र निर्माण केले. नुसते निर्माणच केली नाही, तर त्याचा वापरही केला. दुसऱ्या महायुद्धात झालेला विनाश आजही विसरता येण्यासारखा नाही. अनुबॉम्ब संपूर्ण जग उध्वस्त करू शकतो, हे माहिती असतानाही प्रत्येक देश ते जवळ बाळगण्याची ईच्छा ठेवतात. मात्र आज या अनुबॉम्बची भीती जेवढी वाटत नाही, तेवढी भीती या स्मार्टफोन नामक आविष्काराची वाटत आहे. हा कल्याणकारी वाटत असलेला स्मार्टफोन मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आरोग्याचे विनाशकारी शस्त्र ठरत आहे. याचा मानवजातीने विचार करणे गरजेचे आहे. 

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच संवेदनहीन
स्मार्टफोनचा अति आणि चुकीचा वापर इतका वाढला आहे की, तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच संवेदनहीन, बेजबाबदार बनताना दिसत आहे. कुणी कुणाला काय आदर्श द्यावा याचे भानच उरलेले नाही. पूर्वी बाळ जन्माला आले की, खेळणी खेळायला दिली जायची, मात्र आता त्या बाळासमोर स्मार्टफोन दाखवत पुढील पिढीची विध्वंसकता निर्माण करण्यातच आजचे पालक धन्यता मानत आहे. यावर कुठेतरी प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे. खरे तर स्मार्टफोनचा वापर गरजेपुरताच व्हायला हवा; मात्र गरज आपल्या सोयीनुसार ठरवू नये. नाहीतर दिवसभर स्मार्टफोनची गरज असल्यासारखे वाटेल. थोडक्यात काय तर स्मार्टफाेनच्या अतिवापराचे व्यसनात रूपांतर होऊ नये एवढेच..! सोशल मीडिया दिवसभर तपासण्यापेक्षा एक निश्चित वेळ ठरवून घ्यायला हवी. कामासंबंधी मेल चेक करण्याच्याही वेळा ठरवून घ्याव्यात. तासंतास ऑनलाईन चॅटिंग करण्यापेक्षा सरळसरळ कॉल करून बोलून घेणे योग्य असेल. मात्र किती बोलावे यावरही नियंत्रण असायला हवे. असे काही नियम करून घेतल्यास मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आरोग्य ठीकठाक राहण्यास नक्कीच मदत होईल. 

स्मार्टफाेन शाप की वरदान  
मी शाळॆत म्हणजे सहावी पासून तर दहावीपर्यंत परीक्षेत एक निबंध लिहायचो. तो म्हणजे ‘विज्ञान शाप कि वरदान..!’ आज हा लेख लिहत असताना त्या निबंधाची आठवण झाली. त्या निबंधाचा शेवट मी नेहमी एक वाक्याने करायचो, ते वाक्य म्हणजे ‘तसे पाहिले तर विज्ञान एक वरदान आणि शाप असे दोन्हीही म्हणता येईल. विज्ञानाचा वापर कसा होतोय यावर विज्ञान शाप की वरदान हे ठरेल.’ तसेच स्मार्टफोनचेही..! स्मार्टफोनचा वापर कसा होतोय, यावर तो आपल्यासाठी शाप किंवा वरदान असेल..! स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे सामाजिक, शारीरिक आणि मानसिक नकारात्मकता वाढते. वैचारिक क्षमता लोप पावत जाते. अशी लक्षणे म्हणजे माणूसपणाचे पतन होय..! असे तज्ञांनी संशोधनाअंती स्पष्ट केले आहे. स्मार्टफाेनचे आकर्षण वाढणे आराेग्यासाठी चांगले नसल्यामुळे त्याचा वापर कमी करायला हवा किंवा थांबवायला हवा. यावर आत्मचिंतन करत योग्य निर्णय घेणे हिताचे ठरेल. स्क्रीनपासून काही काळ दूर राहण्याबराेबरच वापराची वेळ निश्चित करूनसुद्धा स्मार्टफोनचे आकर्षण कमी करता येत असल्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे. रात्री झाेपताना फाेन दुसऱ्या खाेलीत ठेवणे आणि जेवणाच्या वेळी घरातील सर्वांचे फाेन बंद ठेवल्यास, एकमेकांमधील जिव्हाळा वाढेल. याशिवाय नाेटिफिकेशन्सचा आवाज बंद करणे,  स्कीन ग्रे-स्केलवर आणणे, अनावश्यक अ‍ॅप्स काढून टाकणे हे उपायसुद्धा उपयोगी ठरतील. इच्छाशक्ती असेल, तर स्मार्टफाेनच्या आकर्षणातून बाहेर पडणे नक्कीच शक्य आहे..! आणि ते आज, आताच ठरवले गेले पाहिजे. कारण लेख वाचताना नक्कीच स्मार्टफोनचा अतिवापर कमी करण्याची इच्छा आपल्या मनात जागृत झाली असेल. म्हणून आताच पाच मिनीटे काढून स्वनियंत्रणासाठी काही नियम ठरवून घ्या..! आणि या नियमांचे काटेकोरपणे अनुकरण करा..! नक्कीच स्मार्टफोन आपल्यासाठी एक वरदान ठरेल…!

लेखक : कैलास एन. हिरोडकर

संपादक : एचके ब्लॉग

संचालक : एचके लर्निंग अँड एनएनए


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली