लोकशाही साक्षरता
शिर्षक वाचून आश्चर्य वाटले ना..?
मित्रहो, आपण सारे साक्षर आहोतच; पण, काही अपवाद वगळता आपण केवळ लिहिण्या-वाचण्यापूरते किंवा पदव्या मिळविण्यासाठीच साक्षर झालो आहोत. वस्तुत: आपण ‘लोकशाही’च्या अनुषंगाने खरोखरच साक्षर झालो का, यावर प्रत्येकाने आपापल्या परीने विचार करावा.
भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. तेव्हा कोठे भारत स्वतंत्र होऊन लोकशाही राष्ट्र बनले. संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा हक्क प्रदान केला. परंतू, एवढ्या वर्षानंतरही मतदानाची टक्केवारी वाढायचे नाव घेत नाही. याचा अर्थ काय?
तद्वत्च, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपल्या गावीही नसते. मतदानाचे पवित्र कर्तव्य आपण सद्सद्विवेक बुद्धीने व विवेकाने वापरतो का? मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? यासारख्या प्रश्नांचा धांडोळा घेण्याची आज खरी गरज आहे. आपण जी व्यवस्था स्विकारली, त्यानुसार समाजाला ‘लोकशाही साक्षर’ करणे, लोकांचे समुपदेशन करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. प्रत्यक्षात मात्र आपले लोकप्रतिनिधी यात कमी पडले. आपण मतदार यादीत नाव नोंदवणे, मतदान यादीत नाव शोधणे या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींवर सोडून मोकळे होतो अन् पुन्हा त्यांच्याच नावाने टाहो फोडतो.
याचाच अर्थ असा की लोकशाहीचा अन् एकुणच या व्यवस्थेचा अर्थच आपल्याला समजलेला नाही. याला काही अपवाद असू शकतात. पण, सरसकट संपूर्ण भारतीय जनता आजही लोकशाहीच्या बाबतीत निरक्षरच आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
आपण मतदानाद्वारे ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो, ते धोरण ठरवितात व त्याची अमंलबजावी करणे हे प्रशासनाचे काम असते. आता धोरण म्हणजे काय, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण, नगर नियोजन, कृषी यासारख्या नानाविध गोष्टी, कि ज्यांचा आपल्या रोजच्या जगण्याशी थेट संबंध येतो. परंतू, लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा आपल्या आतल्या मनाला साद घालून वापरतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे.
स्वातंत्र्याच्या पाऊण शतकानंतरही आपण मतदानाची टक्केवारी ९० किंवा १०० टक्यांपर्यंत वाढवू शकलेलो नाही, हे आपले अपयश नाही का? जेव्हा या देशात मतदानाची टक्केवारी वाढेल, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन करण्याचा सुज्ञपणा आपल्यात येईल व आपल्या जगण्या- मरण्याचेच प्रश्न केंद्रीभूत ठेऊन ते व्यवस्थेच्या माध्यमातून सोडविण्याचा आपण प्रयत्न करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने ‘लोकशाही साक्षर’ झालो असे म्हणता येईल. हा सुवर्णदिवस लवकरच यावा, या अपेक्षेतूनच हा लेखन प्रपंच..!
लेखक सामाजिक व माहिती
अधिकार कार्यकर्ते आहेत.
मोबाईल : ९८८१०६४१२३
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा