रांजणवाडी आणि त्यावर उपाय
डोळ्याच्या पापणीवर किंवा पापणीच्या कडेवर आलेली पुळी, फोड किंवा गाठीला रांजणवाडी म्हणतात. काही ठिकाणी बोलीभाषेत या आजाराला किरपुळी देखील संबोधले जाते. आयुर्वेदात या आजाराला अंजननामीका, अंजना, अंजुरली असेही म्हटले जाते. डोळ्याचे कार्य सामान्य राहण्यासाठी, डोळ्यात निसर्गत: अविरतपणे एक विशिष्ट द्रव तयार होतो. तो म्हणजे अश्रू. या अश्रूमध्ये असलेले वेगवेगळे घटक हे निसर्गत: डोळ्यात असलेल्या ग्रंथीमार्फत तयार होततात. पापण्यामध्ये असलेल्या झिज, मोल आणि मिबोमियन नावाच्या ग्रंथी असतात. या ग्रंथी अश्रूंमधील महत्त्वाचा घटक तयार करतात. काही कारणामुळे या ग्रंथींना जंतूसंसर्ग झाल्यास किंवा या ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या द्रवास बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाल्यास पापणीवर सूज येते. पापणीवर पुळी, फोड किंवा गाठ तयार होते. यालाच रांजणवाडी किंवा किरपुळी असे म्हटले जाते. रांजणवाडीचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. तसेच मधुमेह झालेल्या आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या प्रौढांमध्येदेखील रांजणवाडीचे प्रमाण जास्त आढळते.
रांजणवाडीची लक्षणे
अचानकपणे डोळ्यात वेदना आणि पापणीवर सूज, खाज, डोळे लाल होणे, टोचणे पाणी येणे अशी लक्षणे आढळतात. त्यानंतर पापणीवर पुळी, फोड किंवा गाठ येते यालाच रांजणवाडी म्हणतात. पहिल्या प्रकारात दोन ते तीन दिवसांनी त्या फोडावर पिवळा ठिपका दिसतो व त्यानंतर त्यातून पू बाहेर येतो. पुढील पाच ते सहा दिवसात रांजणवाडी नाहीशी होऊन हळूहळू पापणी पूर्ववत होते. दुसऱ्या प्रकारात पापणीच्या कडेपासून थोड्याशा अंतरावर छोट्या आकाराची गाठ तयार होते. या प्रकारामध्ये फारशा वेदना नसतात; परंतु यात जंतूसंसर्ग झाल्यास तीव्र वेदना व्हायला लागतात.
रांजणवाडीची कारणे
डोळ्याची अस्वच्छता, सतत डोळ्यांना हात लावण्याची किंवा डोळे चोळण्याची सवय, असंतुलीत आहार, शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, मधुमेह, प्रदूषित वातावरण अशी करणे आहेत. वारंवार राजंणवाडी होणाऱ्या रुग्णांना चष्म्याचा नंबर आला असण्याची शक्यता असू शकते. रांजणवाडीवर दाब देऊन ती फोडण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे जंतूसंसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे औषधोपचाराने सहा ते सात दिवसात अशा प्रकारची रांजणवाडी बरी होते.
साधे आणि सोपे उपाय
गरम पाण्याचा मसाज : सगळ्यात सोपा आणि पटकन करता येईल असा उपाय म्हणजे डोळ्यांना गरम पाण्याचा शेक देणे. रांजणवाडी आल्यानंतर डोळ्यांना येणाऱ्या पुळीमध्ये पस साचलेला असतो. तो बाहेर येणे फारच गरजेचे असते. स्वच्छ कॉटन कपडा गरम पाण्यात बुडवून शेक घेतल्यास या आजारापासून लवकर सुटका होते. असे केल्याने डोळ्यांचे ठुसठुसणे कमी होईल. शिवाय पुळी योग्यवेळी फुटून पुढील संसर्ग होणार नाही.
लसणीचा रस (Garlic Juice) : लसूण यावर उत्तम उपाय आहे. लसणाचा थोडासा रस कापसावर घेऊन रांजणवाडीवर लावल्यास पुळी लवकर बरी होण्यास मदत होते. शक्य झाल्यास एका स्वच्छ भांड्यात लसणीची पाकळी कुटून घ्यावी, त्याचा रस काढून तो स्वच्छ बोटाने पुळीवर लावावा. लसणीचा रस लावल्यानंतर थोड चुरचुरल्यासारखे वाटेल.;पण थोड्यावेळाने नक्कीच बरे वाटते.
केस काढणे (Affected Hair Plucking) : रांजणवाडीमध्ये पापणीच्या एका केसाखाली सगळा पू अडकलेला असतो. जर तो पापणीचा केस इतर कोणत्याही केसांना न हलवता काढता आला तर पुळीमधून सगळा पू अगदी सहजपणे बाहेर पडतो. असे करताना पुळी दाबण्याची मुळीच गरज नसते. अगदी सहजपद्धतेने तो केस काढला की, रांजणवाडीपासून त्वरीत आराम मिळतो. .
धण्याचे दाणे (Coriander Seeds) : धणे हे देखील रांजणवाडीवर उत्तम काम करतात. धण्याच्या पाण्याने डोळे अलगद धुतल्यास आराम मिळतो. एका भांड्यात एक चमचा धण्याचे दाणे घेऊन ते चांगले उकळावे. पाणी थंड झाले की, एका स्वच्छ कपड्याने डोळ्यांना लावून ठेवल्यास या आजारापासून सुटका मिळते.
हळद (Turmeric Powder) : हळद ही अँटीसेप्टिक असून अनेक जखमांवर रामबाण उपाय म्हणून वापरली जाते. शिवाय नैसर्गिक असल्यामुळे त्याचे दुष्परिणामही होत नाही. हळद भिजवून ती डोळ्यांना लावून ठेवल्यास रांजणवाडीपासून आराम मिळतो. हळदीचा लेप तयार करुन डोळ्यांना लावत असाल तर तो काढताना योग्य काळजी घ्यावी.
बेबी शँम्पू (Baby Shampoo) : अस्वच्छता हे रांजणवाडीचे महत्वाचे कारण आहे. जर डोळ्यांची स्वच्छता या काळात राखायची असेल तर बेबी शँम्पूचा उपयोग करणे अतिउत्तम . त्वचा किंवा केस धुताना याचा वापर केल्यास डोळ्यांत कोणतेही हानिकारक केमिकल्स जात नाहीत. शिवाय डोळे स्वच्छ होण्यासही मदत मिळते. त्यामुळे बेबी शँम्पू हा यावर एक उत्तम इलाज आहे.
कोरफडीचा गर (Aloe Vera Gel) : कोरफड थंड असते. रांजणवाडीमध्ये डोळे सतत जळजळत असतात. डोळ्यांची आग होते. डोळ्यांमधून पाणी आल्यासारखे होते. अनेकदा ही पुळी इतकी मोठी होते की, डोळे उघडण्यासही अडथळा येतो. डोळ्यांचे सतत दुखणे त्रासदायक ठरते. अशावेळी डोळ्यांना थंडावा देण्यासाठी कोरफरडीचा गर महत्वाचा ठरतो.
पेरुची पाने (Guava Leaf) : पेरुची पानेदेखील रांजणवाडीवर अत्यंत गुणकारी असतात. पेरुचे एक ताजे पान घेऊन ते कुटून रांजणवाडी आलेल्या पापणीवर लावल्यास आराम मिळतो. रांजणवाडी बरी होण्यास मदत मिळते. दिवसातून एकदा हा गर लावल्यास त्रास कमी होतो.
बटाट्याचा रस (Potato Juice) : बटाट्यामध्ये असलेला स्टार्ज त्वचेसाठी फायदेशीर असतो. बटाट्याचा रस रांजणवाडीवर एक उत्तम उपाय आहे. रांजणवाडीवर बटाट्याचा रस लावल्यास पुळी सुकण्यास मदत होते. शिवाय डोळ्यांचे ठुसठुसणे कमी होऊन रांजणावाडीमुळे डोळ्यांवर राहणारे डागही कमी होतात.
रांजणवाडी संसर्गजन्य आहे का?
रांजणवाडी हा संसर्गजन्य आजार आहे. एखाद्याला रांजणवाडी आली असेल आणि जर त्याच्या खासगी वस्तू काही काळासाठी कुणाकडून वापरल्या गेल्या तर आजार पसरण्याची शक्यता असते. मात्र प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हा त्रास सहज होत नाही.
x
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा