आरोग्यदायी दिनचर्या आणि आहार

एचके लर्निंग अँड एनएए :
जगन सुंदर, सुखर आणि नियोजित असावे. असे सुविचार नेहमीच आपण वाचतो किंवा ऐकतो; पण अनुकरण होत नाही. परिणामी विविध समस्या त्रासदायक बनत जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आहाराविषयी जागरूक राहावे, असे सल्ले सतत मिळतात. पण हे सल्ले कितपत पाळले जातात हा एक प्रश्नच आहे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण केल्यास उत्तर सहज मिळेल. मात्र यात सुधारणा न करता 'कळतं पण वळत नाही' असे म्हणून शारीरिक, मानसिक संकट अधिकाधिक वाढवले जातात. एक वेळ अशी येते की, यातना सहन करण्याशिवाय हाती काहीच उरत नाही..! म्हणूनच आपल्याला वेळीच सावध होऊन आरोग्यदायी दिनचर्या आणि आहाराचे नियोजन करायचे आहे. चला तर मग आरोग्यदायी दिनचर्या आणि आहारावर सविस्तर चर्चा करुयात.

शारीरिक, मानसिक स्वस्थतेसाठी
सकाळी 7 वाजता उठावे. उठल्यावर जेथे आहात तेथेच शरीर आणि मन स्थिर करत 10 मिनिटे ध्यानस्थ व्हावे. ध्यानस्थ होताना इतरत्र विचार न करता आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. ध्यान संपल्यानंतर 2 मिनिटे मनाशी संवाद साधावा. तो असा.., मी स्थिर आहे, आज दिवसभरात जे काही घडेल ते सकारात्मक घेत आनंदी असण्याचा प्रयत्न असेल. माझी शारीरिक प्रकृती अगदी उत्तम आहे. काही त्रुटी असतील तर त्या भरून काढण्याचा पुरेपुर प्रयत्न असेल. परिस्थिती कशीही असो, मी रागावणार नाही, चिडणार नाही, दुःखी होणार नाही. अचेतन मन जागृत ठेवून कामकाज असेन. असे मनाला आश्वस्थ करत स्वतःसह मित्र-परिवारावर सुरक्षा कवच बनवण्यासाठी विधात्याजवळ प्रार्थना असायला हवी. असे केल्याने आपणास संपूर्णतः सकारात्मकतेची अनुभूती होईल. जी मानसिक अस्वस्थता दूर करणारी असेल. नंतर एक लिटर पाण्यात एका लिंबाचा रस आणि त्यात थोडे सेंधे मीठ टाकून पाणी प्यावे. पाणी नेहमी खाली बसूनच पिले गेले पाहिजे. त्यानंतर एक चमचा गुळवेल पावडर अर्धा ग्लास कोमट पाण्यासोबत घ्यावी. नंतर ब्रश आणि प्रातः विधी करावी. रात्रभर तोंडात जी लाळ साचलेली असते ती खूप आरोग्यदायी असते. म्हणूच ब्रश नंतर करावा. 

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडा
वरील कृतीसाठी जवळजवळ अर्था तास लागेल. त्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडावे. जवळजवळ 3 हजार पावले चालवीत, म्हणजे जवळजवळ अर्धा तास. याचबरोबर एक निसर्गरम्य ठिकाण  निश्चित करावे. याठिकाणी एकाग्र होऊन प्राणायाम आणि योग साधना करावी. हे सर्व झाल्यावर आपण सकाळी 8:30 वाजता घरी परताल. घरी आल्यावर कुटुंबातील प्रत्येकाला शुभप्रभात म्हणत छान संवाद साधावा, आंघोळ करावी. 9:00 वाजता नियमित नाश्ता घ्यावा. यात मोड आलेले कडधान्य (मूगाचे प्रमाण जास्त, मठ, मसूर, हरभरा, चवळी) असायला हवेत. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळते. नाश्ता करून झाल्यावर अर्ध्या तासाने चहा घेता येईल. लगेच चहा घेवू नये. त्यामुळे विपरीत परिणाम होतो. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे दरम्यान जड अन्न ग्रहण करू नये. मात्र शरीराला इतर पोषक घटक मिळण्यासाठी काही पदार्थ घेता येतील. (जसे ज्यूस, खजूर, अंजीर, सुका मेवा, दूध, केळी आणि इतर फळं). आपल्या शरीरात झिंक योग्य प्रमाणात असायला हवे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते आणि व्हायरल इन्फेक्शन होत नाही. म्हणून दिवसभरात कमीतकमी 5 ते 8 ग्रॅम पांढरी तीळ चाऊन खावी. यात मुबलक प्रमाणात झिंक असते. 

असे असावे दुपारचे जेवण
दुपारी 2 वाजता जेवण घ्यावे. जेवताना एक अर्धे लिंबू, एक टोमॅटो, काकडी, गाजर, कांदा यांचा सलाड म्हणून आहारात समावेश असावा. आठवड्यातून 3 दिवस विविध डाळी आणि तीन दिवस वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांचा समावेश असायला हवा. जेवताना मोबाईल किंवा टिव्ही पाहू नये. प्रत्येक घास बारीक चाऊन खावा, म्हणजे यकृतवर (लिव्हर) तान येणार नाही. अस्वस्थ, थकल्यासारखे जाणवणार नाही. पित्ताचा त्रासही टाळता येईल. जेवण झाल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असेल तर ती बंद करावी. अशामुळे पचनसंस्था मंदावते. हवं तर जेवण झाल्यानंतर एक तासाने चहा घेता येईल. जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. कमीतकमी अर्धा तास इतरत्र फेरफटका मारावा. शक्यतो दुपारी झोपू नये. शांत बसून किंवा लेटून वाचन किंवा भविष्यात घडलेल्या सकारात्मक आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या घटनांचे स्मरण करावे. मनाला त्रासदायक घटनांचे किंवा अनावश्यक काळजीचे चिंतन नसावे. आठ्वड्यातुन एक दिवस किंवा कमीतकमी 12 तास उपवास करावा. उपवासासाठी तोच दिवस निवडावा ज्या दिवशी कामाला सुटी असेल. उपवास आणि आराम मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढवेल. यकृताला (लिव्हरला) स्वतः सर्व्हिसिंगसाठी वेळ मिळेल. 

अशी असावी सायंकाळ
सायंकाळी 5 वाजता हलका नाश्ता घ्यावा. जसे दूध-केळी, चहा-बिस्कीट. प्रत्येकाची कामाची शिफ्ट वेगळी असेल त्यानुसार ठरवावे. दिवसा काम करणारे आणि रात्री उशिरा काम करणारे लोक शहरी भागात राहतात. दिवसा काम करणारे सायंकाळी आपल्या कार्यालयातून घरी परततात. त्यांनी कार्यालयीन मन आपल्या कार्यालयातच ठेवून कौटुंबिक मनासह घरी परतावे. घरी परतल्यावर भोवताली आनंद पेरत कुटुंबातील सकारात्मकता वाढवावी. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांनी आपली सकारात्मकता टिकवून कामावर लक्ष केंद्रित करावे. कार्यालयात आपण कुठल्याही पदावर असाल; मात्र घरी परतताना विविध नात्यांना योग्य न्याय देण्यासाठी त्या-त्या भूमिकेत वावरण्यासाठी सज्ज व्हायला हवे. 

रात्री हलका आहार असावा
रात्रीचे जेवण 8 ते 9 पर्यंत व्हायला हवे. या जेवणात हलका आहार असावा. रात्री आंबट पदार्थ टळावे. संपूर्ण दिवसभराच्या आहारात भाताचे प्रमाण कमी असावे. बैठे काम करणाऱ्यांनी भात टाळला तरी चालेल. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यानी भात रोज आणि प्रत्येक जेवणात घ्यावा. रात्रीचे जेवण शक्यतो कुटुंबासोबत करावे. कार्यालयात असणाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रात्रीचे जेवण करावे. रात्री शक्य तेवढ्या लवकर झोपावे. रात्री झोपताना एक ग्लास गार दूध अवश्य घ्यावे. शतपावली तेढीच महत्वाची. आपल्या मित्र-परिवाराशी प्रत्यक्ष किंवा मोबाईलद्वारे संवाद साधावा. यामुळे दुरावा वाढत नाही. प्रेम आणि आत्मीयता वृद्धिंगत होते. 

मोबाईल वापर मर्यादित असावा
अत्यंत महत्वाची बाब म्हणजे मोबाईलचा वापर हा कामासाठीच केला गेला पाहिजे. तासनतास सोशल मीडियावर राहणे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी पोहचविणारे ठरते. याचा अर्थ असा नाही, की सोशल मीडिया बघूच नये. बघावे..!, मात्र यासाठी नियोजित वेळ ठरवुन घ्यावी. सध्या मोबाईलस्क्रीन समोर नसला तर अस्वस्थ होणाऱ्यांचे  प्रमाण वाढत आहे. जे खूपच धोकेदायक आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग मिळाल्यामुळे मोबाईलवर सतत आणि दीर्घकाळ बोलण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी मेंदूचे विकार वाढल्याचे संशोधनात दिसून येत आहे. मेंदूच्या नसांवर अधिक ताण वाढून अनेकांनी जीवही गमावल्याच्या बातम्या आहेत. यासह हृदय विकार, कानाचे विकार, स्मरणशक्ती मंदावणे, चीडचीड वाढणे, आत्मविश्वास खालावणे अशा विकारांनी तरुण बाधित होत आहे. म्हणून मोबाईल, टिव्ही वापरासाठीसुध्दा नियोजन असायला हवे. काय मग, करतायना 'आरोग्यदायी दिनचर्या आणि आहाराचे' अनुकरण? इतरांसाठी नको पण स्वतः साठी कराच..! चुकीची दिनचर्या दुर्धर आजाराचे कारण बनू शकते. जे कुटुंबासह स्वतःलाही त्रासदायक ठरेल. आपल्या चुकीची शिक्षा कुटुंबाला का? एक दुर्धर आजार संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती शून्यावर आणून ठेवतो. त्यासाठी कल्याणकारी बनत स्वतःची मदत करा..! आणि कुटुंब सुख-समृद्ध बनवा. 

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली