निष्काळजीतूनच वाढतात आजार..!
हो..! हे अगदी खरंय..! निष्काळजीतूनच आजार वाढतात. ‘कळतं पण वळत नाही’ या उक्तीप्रमाणे आयुष्य सुरू असते. काळजी करणं हा मानवी स्वभावच आहे. प्रत्येक जण स्वत:सह आपले स्वकीय, मित्रपरिवार यांची काळजी करत असतात. मात्र काळजी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काळजी घेतली गेली पाहिजे. आता हेच पाहाना..! मायग्रेनचा त्रास, लठ्ठपणाची चिंता, लॅपटॉपच्या सतत वापराने होणारा त्रास, धम्रपाणानामुळे होणारे आजार हे सर्व माहिती असतानाही योग्य ती काळजी घेतली जात नाही, याला काय म्हणावं..! चला तर यावर सविस्तर चर्चा करूया..! काळजी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काळजी घेऊया..! म्हणजे अनावश्यक चिंता, काळजी, अस्वस्थता, उदासीनता चिडचिड टाळता येईल.
योग-प्राणायामने मायग्रेन टाळा
चीज, अल्कोहोल, चॉकलेट, नट्स, तीव्र प्रकाश, झोपेचा त्रास, मासिक पाळी, मेनोपॉज, प्रवास, हवामानातील बदल आणि तणाव या सर्वांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेन या आजाराचे चार टप्पे असतात. 1) प्रोड्रोम फेज : यात चिडचिड, उदासपणा आणि वारंवार जांभई येते. 2) दुसरा टप्पा ऑरा फेज : यात डोळ्यांसमोर प्रकाशाच्या तिरक्या रेषा दिसतात. शरीर सुन्न अन् मुंग्या आल्यासारखे वाटते. 3) तिसरा टप्पा म्हणजे डोकेदुखीचा : यात दोन ते तिन दिवस डोकं दुखत राहत 4) चौथा टप्पा म्हणजे मायग्रेन हँगआउट : ज्यामध्ये अस्वस्थता, चिडचिड, गोंधळल्यासारखे होते. वरील कुठलीही अवस्था दुर्लक्षित करू नये. योग्यवेळी योग्य ती काळजी घेतल्यास यापासून नक्कीच मुक्ती मिळवता येते. धूम्रपान, अल्कोहोल, कॅफिन या व्यसनांपासून लांब राहिल्यास मायग्रेन नक्कीच टाळता येतो. मायग्रेनने पीडित महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या टाळायला हव्यात. रासायनिक औषधांशिवायही मायग्रेन थांबवता येतो; मात्र त्यासाठी योग-प्राणायाम आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे.
सावधान..! लठ्ठपणा वढतोय
लठ्ठणापणा ही अशी अवस्था आहे, की ज्यामुळे मानसिक आजार तर वाढतोच, शिवाय आत्मविश्वासही कमी होत जातो. लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा आयुष्यात अस्वस्थता वाढत जाते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक आहे. तो नियमित केलाच गेला पाहिजे. त्यासोबतच हेल्दी रुटीनही असायला हवी. लठ्ठपणावर नियंत्रणासाठी सकाळी दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर पूर्ण दिवस ऊर्जावान राहते. मेटाबॉलिज्म सुरुळीत काम करते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते. उच्च प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घेतल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही, वजनही कमी होण्यास मदत होते.
लॅपटॉप वापरताना काळजी घ्या
दिवसभर लॅपटॉप वापरल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. लॅपटॉपमधून निघणारी उष्णता शरिरीला हानी पोहचवू शकते. मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते, असे तज्ञांचे मत आहे. लॅपटॉपपेक्षा जास्त नुकसान त्याच्याशी जोडलेल्या वायफायमुळे होते, कारण रेडिएशन हे इंटरनेट कनेक्शनशी संबंधित आहे. हार्ड ड्राईव्हमधून कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित होते, रेडिएशनच्या प्रभावामुळे निद्रानाश, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून आपणही लॅपटॉपचा वापर करत असाल तर काळजी घ्या..! लॅपटॉप मांडीवर न ठेवता टेबलावर ठेवूनच काम करा. शक्यतो ब्रेक घेत काम करा.
धूम्रपान : किती हा निष्काळजीपणा..!
धूम्रपान करणे आरोग्याला हानिकारक आहे. मात्र सर्रास धूम्रपान होताना दिसते. धूम्रपानामुळे रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग हे जिवघेणे आजार होतात. रक्त गोठण्याची शक्यताही असते. याशिवाय कोलेस्टेरॉलचीही पातळीही वाढते. हे सर्व माहिती असतानाही धूम्रपान काहीकेल्या कमी होत नाही. याचा अर्थ असा की, स्वत:कडून स्वत:सह कुटुंबाचा विनाश करण्याची तयारीच..! किती हा निष्काळजीपणा..! धम्रपान करणाऱ्यांमध्ये मुख्यतो विटामिन B 12, ए (A), सी (c) चा अभाव दिसून येतो. ज्यामुळे अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता, हृदयाची धडधड, हात-पाय सुन्न होणे यासारख्या समस्या उद्भवतात. धूम्रपान करणाऱ्यांनी धूम्रपान करणे सक्तीने टाळायलाच हवे. आहारात भोपळा, कॉर्न, लाल मिरची, गाजर, संत्री, लिंबू, अननस, हिरवी मिरी, टरबूज अशा पदार्थांचा समावेश करायला हवा. यामुळे भविष्यात होणारा त्रास टाळता येईल. पण धूम्रपान करणे सोडले तरच..!


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा