आरोग्यदायी जीवनाची पंचसूत्रे..!
कळतं पण वळत नाही..! ही म्हण आपल्याला लागू होते का? हे स्वत:च तपासून पाहायला हवे. आयुष्यात निरोगी राहण्यासाठी मोफत सल्ले उपलब्ध आहेतच; मात्र त्याचे अनुकरण आपण करतो का? हेही पाहायला हवे..! विटामिनचे प्रकार, प्रोटीनचे प्रकार, योग, प्राणायाम, मेडीटेशन सर्व काही माहित असतं मात्र ‘जगाला सांगे ज्ञान अन् स्वत: कोरडे पाषाण’ असचं होतं..! खरं तर असं व्हायला नकोच..! चला तर आज आपण स्वत:ला बदलवूया..! निराेगी जगण्याचा संकल्प करूया..! आपण या लेखात आरोग्यदायी जीवनाच्या पंचसुत्रांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. या पंचसुत्रांचे अनुकरण व्हावे यासाठी नुसता प्रयत्नच नव्हे तर प्रत्यक्षात कृतीच करायची आहे..! यात शंभर टक्के फायदा आपलाच..!
आरोग्यदायी सूर्य किरणे : सकाळची कोवळी सूर्य किरणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. यापासून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळत असल्याने हाडे मजबूत होतात. कोवळी सूर्य किरणे शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार करते ज्यामुळे झोपेची समस्या दूर होते. थोडा वेळ उन्हात बसल्याने मानसिक तानही दूर होतो.
रोज स्वत:साठी एक तास द्या : पहाटेच्या निसर्गमय, नयनरम्य आणि आराेग्यदायी वातावरणात अर्धा तास पायी चालल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच शिवाय संपुर्ण दिवस उत्साहवर्धकही होतो आणि कार्यक्षमताही वाढते. त्याचबरोबर रोज व्यायामही करायला हवा ज्यामुळे शारीरिक आजार दूर राहतात. याचबरोबर योगासने, प्राणायामही करायला हवे. सकाळी अर्धा ते एक तास स्वत:साठी द्यायलाच हवा. या एक तासांत फिरणे, योग, प्राणायाम यासाठी नियोजन करावे.
साधा आणि सकस आहार घ्या : कोलेस्टेरॉल, मधुमेह, हृदयाच्या समस्यांसारखे धोकादायक आजार टाळायचे असतील. तर आहारातून तेलकट, मसालेदार आणि जंक फूड पूर्णपणे टाळायला हवेत. साखर आणि मीठाचे प्रमाणही आहारात कमी करायला हवे. साधा अन् सकस आहारामुळे केवळ शरीरच नाही तर मनही निरोगी राहते. जेवणाची वेळही निश्चित करायला हवी. कारण अवेळी आहार घेतल्याने विविध शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात.
भरपूर पाणी प्या : शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूपच गरजेचे आहे. दिवसभरात किमान 6 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवे. कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. तसेच लठ्ठपणावरही नियंत्रण ठेवता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचा निरोगी राहते.
पुरेशी झोप घ्या : शरीर आणि मन निरोगी ठेवायचे असेल तर पुरेशी झोप खुप महत्वाची आहे. गाढ आणि शांत झोपेमुळे विविध मानसिक आणि शारीरिक व्याधींवर मात करता येते. गाढ आणि शांत झोपेसाठी मन स्थिर असणेही तेवढेच गरजेचे आहे. विविध विचारांचा कल्लोड मनात असेल तर गाढ झोप अशक्यच. म्हणून झोपण्याआधी मनातील विचार थांबवून अर्धातास मेडीटेशन करायला हवे. त्याचबरोबर गाढ आणि शांत झोप येण्यासाठी मोबाईल, टीव्हीचा वापर झोपेच्या वेळी टाळावा.
(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा