सावधान..! बद्धकोष्ठता टाळा..!
निरोगी आरोग्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीराची हालचालही तितकीच महत्त्वाची आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यासाठी व्यायाम, योगासनांचा सराव नियमित करणेही आवश्यक आहे. सकस आहाराचा अभाव आणि शरीराची हालचाल हाेत नसल्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होऊ शकतो. बद्धकोष्ठता म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. जेणेकरून अन्नाचे पचन होण्यास अडथळा निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ आहारामध्ये हिरव्या भाज्या, टरबूज, कलिंगड, केळे आणि डाळींचा समावेश करावा. यासह रोज १ तास व्यायाम, प्राणायाम, योगा करावा. जेणेकरून तन-मन स्वस्थ राहील.
बद्धकोष्टतेमुळे होणारा त्रास : पोट साफ न होणे म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या अधूनमधून येतच असते. याकडे दुर्लक्ष मुळीच करू नये. बद्धकोष्ठतेमुळे त्वचेविषयीच्या समस्या निर्माण होतात. त्वचेवर मुरुमे, डाग होतात, त्वचेची चमक नाहीशी होते. त्वचेवर निस्तेजपणा येण्यासोबतच मृत त्वचेचा थरही जमा होऊ शकतो. बद्धकोष्ठतेमुळे पोटाच्या आतला त्रास चेहऱ्यावर पिंपल्सच्या रूपात दिसतो. पोट साफ न होण्याची अनेक कारणे असू शकतात. बद्धकोष्ठतेमुळे शरिरातील उष्णता वाढते ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, जास्त घाम येणे तसेत तोंड येणे अशा समस्याही उद्भवतात. पोटात उष्णता वाढल्यामुळे खूप घाम येतो त्यामुळे शरीराची दुर्गंधी आणि त्वचेची छिद्रे वाढण्याची समस्या जाणवते. त्वचेची छिद्रे वाढल्यामुळे, त्वचा सैल होऊन सुरकुत्या वाढतात. बद्धकोष्ठतेमुळे त्वचा जास्त प्रमाणात तेलकट होते. तेलकट त्वचा दिसायला खूप चिकट दिसते. अनेक वेळा त्वचेवर जास्त तेलामुळे घाण चिकटते, त्यामुळे इन्फेक्शन होऊन त्वचाविकार होतो.
बद्धकोष्टता टाळण्यासाठी उपाय : कोमट पाणी - बद्धकोष्ठतेवर उपचार करण्याचा पहिला आणि सोपा उपाय आहे. म्हणजे पाण्याचे सेवन वाढवणे. बद्धकोष्ठता ही नेहमीची समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी किमान 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावायला हवी. याशिवाय दिवसभरात 2-3 लिटर पाणी प्यायला हवे. प्रोबायोटिक्स हे निरोगी आतड्यांतील जीवाणूंना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रिय अन्न असून बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. दही आणि केफिर सारखे पदार्थ नैसर्गिक प्रोबायोटिक्सचे स्त्रोत आहेत. अननसाचा रस केवळ स्वादिष्टच नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यात ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम असते, जे बद्धकोष्ठता आणि ओटीपोटात क्रॅम्प कमी करण्यास मदत करते. बडीशेप पचनसंस्थेमध्ये गॅस्ट्रिक एंजाइम वाढवते. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज अर्धा चमचा बडीशेप पावडर एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेतल्यास बद्धकोष्ठता टाळता येते. हे अपचन आणि पोटाच्या इतर समस्यांवर देखील प्रभावी आहे.
(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा