विस्कटलेले बंध..!

एचके लर्निंग अँड एनएए :
गेल्या चार - पाच दिवसांपासून वातावरणातील गारवा वाढलाय... अधून मधून अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय... मॉर्निंग वॉक शहरी लोकांचा जगण्याचा महत्वाचा भाग, कारण या मॉर्निंग वॉकमुळे अनेक अनोळखी बंध जुळून येतात. एकमेकांचे सुख, दुःख शेअर करत घट्ट मैत्री होते. मग मॉर्निंग वॉकमुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपण्यास मदत होते. मात्र या अवकाळी पावसामुळे गडबड झालीय. गेल्या दोन दिवसांपासून विशाल मॉर्निंग वॉकसाठी दिसला नाही. निरोपही नाही. शोधही घेता येत नाहीये; कारण भेट फक्त मॉर्निंग वॉक पुरतीच; पण या एक तासाचा संवाद हवाहवासा, मन स्थिर करणारा..! मी गार्डन मधील बाकावर स्वतःशीच बोलत असताना हळूच दीर्घ श्वास घेत विशाल येऊन बसला. काहीतरी निर्णय घेतल्यासारखे भाव चेहऱ्यावर दाखवत पुन्हा दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, ‘‘बस्स...! ठरवलंय आता...! अजिबात त्रास करून घ्यायचा नाही...! अरे किती सहन करणार हे मन..! आणि कशासाठी..! जाऊ दे... काहीही होवो... यापुढे मी माझे माईंड सेट करूनच जगणार याच्याशी..!’’ असे म्हणत तो पुन्हा दीर्घ श्वास घेत कधी खाली तर कधी आकाशात पाहत माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. मलाही संदर्भ समजून घ्यायची गरज भासली नाही. मी त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणालो, ‘‘अरे काय ठरवले, असे आपल्या रक्ताच्या नात्यासोबत माईंड सेट करून कस काय खोटं खोटं जगता येईल. सख्खा भाऊना तुझा तो...!’’ मलाच त्याची अडचण सोडवण्यासाठी उत्तर सापडत नव्हतं. मी सहज त्याला शांत करण्यासाठी शब्दफेक केली. तो ताडकन जागेवरून उठला, मलाही उठवलं आणि एका वाक्यात भळभळ बोलत सुटला. त्याने मॉर्निंग वॉक बोलतच सुरू केली. मीही एैकत चालू लागलो. तो म्हणाला, ‘‘बघ मी ठरवलय..! माझं काही चुकत असेल तर त्यावर नंतर तू बोल..! मात्र आता तू मला फक्त एैकून घे..!’’ तो पुढे बोलू लागला.

‘‘आर्थिक अडचणीसाठी जबाबदार... टोचून बोलण, विक्षिप्त वर्तनाचा त्रास... धमक्या देणे, बदला घेण्याची भाषा...चीड येईल तोपर्यंत डिवचने...! आजवर हा माझ्याशी असाच वागत आलाय. बंध टिकून आहे. कुठेतरी पक्की गाठ आहे. तरीही खूप त्रास आहे. यावर पर्याय माईंड सेट करणे असा वाटतोय. जसे इतरांशी माईंड सेट करून जगणं सोप केलंय तसच याच्यासोबतही करण्याचा निर्णय योग्य वाटतोय. आर्थिक त्रास सुटेल तेव्हा सुटेल मात्र मानसिक त्रास आजच सुटतो. वाद मीटतो. खरा संवाद तुटतो; पण वादांपेक्षा सध्यातरी हेच योग्य वाटतेय.’’

विशाल कधी गार्डनमधील लॉनकडे तर कधी भोवतालच्या झाडांकडे पाहत सलग पण मुद्देसुद बोलत होता. त्याने आतापर्यंत माझ्याकडे पाहिलेसुद्धा नव्हते. मात्र मी त्याला निरखून पाहत होतो, त्याचे हावभाव टिपत होतो. त्याने चालणं थांबवलं तसं बोलणंही थांबवलं. आम्ही ज्या उंबराच्या झाडाखाली बाकावर बसून गप्पा करायचो तेथेच तो जाऊन बसला. माझा हात पकडत तो म्हणाला ‘‘बस येथे..! या झाडाखाली माझी चिडचिड, राग नेहमीच शांत होतो..! तुच सांग काय चुकतय माझं..! तुलाही माहित आहे, की चिडचिड, कुणाशी वाद घालने असा माझा स्वभाव मुळीच नाही. तसा स्वभाव असता तर एवढी माणसे मी कशी काय जोडली असती? याच्याशी वाद टाळण्याचा प्रयत्न अनेकदा केलाय, शांत राहून आणि मनाला न पटणाऱ्या वागण्याला मुक संमती देऊन; पण त्याचाही त्रास आत होतोच. मग यावर उपाय काय? हे कळत नाही. सहवासही नको वाटतो आणि दुरावाही नको वाटतो. याच्यापासून अलिप्त जगणं शून्य वाटते आणि सोबतही राहावेसे वाटत नाही. वादात अडकलो तर उत्साह आणि ठरवलेले लक्ष्य धूसर व्हायला लागतात. दुर्लक्ष केले तर मन गुदमरत. पर्याय माहीत असूनही उपाय करता येत नाही. प्रश्न आणि केवळ प्रश्नच. प्रतिउत्तर द्यायची इच्छा अजिबात नसते. नियंत्रणही ठेवतो पण नियंत्रण सुटले तर सर्व राग बाहेर पडतो. जेवढे मारक शब्द असतील तेवढे मारून फेकतो अन् वाद वाढतो. त्यात मलाच दोषी ठरवलं जातं. परत शांत होऊन स्वतः सावरतो अन् या अशा जगण्याची किनार शोधत बसतो..! पण ज्या नात्याला किनारच नाही ती कशी सापडेल रे..! म्हणून माईंड सेट करून जगणं हेच योग्य वाटतेय. खोटं खोटं का होईना पण हसत राहण योग्य वाटतय..!’’ 

त्याच बोलन संपल होत. त्याने जणू डोक्यावर असलेले ओझे धाडकन माझ्यापुढे फेकून दिले होते. अचानक चालणे थांबवून उंबराच्या झाडाचा आधार घेत माझी नजर चुकवत शून्यात एक टक पाहत पुतळ्यासमान तो उभा. मीही स्तब्ध बाकावरच बसून त्याच्याकडे पाहत होतो. रोज ज्या वादामुळे हा संतप्त होत त्रास करून घ्यायचा. यावर उपाय सुचव अशी विनवणी करायचा. आज त्यानेच उपाय शोधलाय पण खोटं खोटं बंध जपण्याचा आणि माईंड सेट करून घेण्याचा. मन शाहारले, हे तर परक्या व्यक्तीसोबत शक्य आहे. यांच्या नात्यात कसे शक्य होईल? सुन्न झालो. काय बोलावे कळत नव्हते. समर्थन करावे, की नको मलाच प्रश्न पडला. बराच वेळ झाला मी निशब्द आणि विशाल तसाच उभा. त्याचे डोळे पाणावलेले, अधून मधून दीर्घ श्वास सुरूच. मी त्याची समाधी भंग केली तर काय होईल समजेनासे झाले. तेवढ्यात तो पाणावलेले डोळे पुसत म्हणाला, ‘‘कसा वाटला निर्णय.’’ क्षणात मूड बदलवत मला मिठी मारत थँक्स म्हणाला. माझा गोंधळ मीटता मीटेना. काय उत्तर द्यावे तेही कळेना. तो मला हलवत म्हणाला, ‘‘खरच यार खूप खूप धन्यवाद आज तुझ्या ब्लॉग आणि मार्गदर्शनाने जगणं शिकवलय. नाती तोडण्यापेक्षा टिकवण जमलय. चल भेटूया उद्या येथेच तोपर्यंत लागू आपल्या कामाला.’’ तो हसत हसत घरी निघाला. मी फक्त ओके बाय म्हणत त्याला पाहतच राहिलो. तो दिसेनासा झाला तरी मी तेथेच उभा स्मित हास्य करत, आणि माझ्या अर्धांगिनी वैशालीला धन्यवाद देत. कारण, माईंड सेट करून जगण्याची आयडिया तिचीच होती. ब्लॉगवरील मार्गदर्शक लेखांची प्रेरणाही तीच होती. तिच्या नितळ पाण्यासारख्या स्वभावाचा मलाच काय सर्वानाच हेवा वाटतो. दुपारी मी निवांत विशालला कॉल केला. ‘‘मित्रा तुझा निर्णय अगदी योग्य आहे. वाद करून नाती तुटत असतील तर त्यांच्यासोबत परक्यासारखं माईंड सेट करून जगणं अगदी योग्य आहे. व्यक्तीचा आहे तसा स्वीकार करणे. त्याला बदलण्याचा हट्ट नसणे म्हणजेच माईंड सेट करत बंध टिकवण..! खूप उत्तम कला आहे ही. नाती टिकवण्यासाठी ही कला आत्मसात करायलाच हवी. जगणं सोपं तर होतच पण भोवताली आनंदही पेरता येतो. अभिनंदन तुझे स्वतःत सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल. ही कला कायम जिवंत ठेव आणि या कलेचे वाटप कर. तुझ्यासारखे अनेक जण आजही विस्कटलेल्या नात्याला टिकवण्यासाठी पर्याय शोधत आहेत.’’ त्याने दाटलेल्या आवाजात हू... असा हुंकार काढत बाय भेटू उद्या असे बोलून निरोप घेतला.

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)



आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली