शांतता अन् मौनातून आत्मानंद
मौन म्हणजे मुनी भाव असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. कमी बोलण्याने संयम राहतो. मौनाला मानसिक तपही म्हटले जाते. बोलण्याच्या क्रियेसाठी उदान वायूची मदत होत असल्याचे आयुर्वेद मानतो. हाच वायू बल आणि सामर्थ्यही देतो. पण, जास्त किंवा अति बोलण्यामुळे उदान वायू जास्त खर्च होऊन शरीर दुर्बल होते. प्राचीन काळी ऋषी-मुनी आणि संत मौन साधना करीत असत. आजच्या आधुनिक काळातही या साधनेचे महत्त्व टिकून आहे. स्वत:ला बदलण्यासाठी, आत्मपरिवर्तन करण्यासाठी मौन ही पहिली पायरी आहे. मौनामुळे आत्मबल वाढून आत्मिक शांतता लाभते. भीती आणि चिंता दूर होते. म्हणूनच ‘एक चूप, हजार सुख’ असे म्हटले जाते. संताप आलेला असताना गप्प राहणे किंवा कोणावर टीका करण्यापेक्षा मौन बाळगणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. बोलल्याने अनेक कामे होतही असतील; मात्र योग्य वेळ, काळ पाहूनच बोलले पाहिजे. नको तेथे, नको ते बोलल्याने होणारी कामे बिघडत असतील तर तेथे मौनच योग्य होय. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे योग्यच; पण ते नेहमी नाही. काही वेळा शांत अन् मौन राहणे जास्त चांगले असते. एखाद्या नाजूक क्षणी नको ते बोलल्याने स्थिती आणखी बिघडू शकते याचे भानही असणे गरजेचे आहे. मुद्देसूद बोलल्याने आदर निर्माण करता येतो. शांतता अन् मौनातून सकारात्मक विचारांची निर्मिती होते. त्यातूनच समस्या सोडविण्याचे मार्गही सापडतात. म्हणूनच निखळ समाधान आणि निरामय जीवनासाठी शांतता अन् मौन अतिमहत्त्वाचे आहे. यातूनच आत्मानंद प्राप्त होत असल्याचे सिद्ध होत आहे.
दोन तास आतून-बाहेरून मौन हवे..! : ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’ या वचनाचे अनुकरण केल्यास आयुष्यात आत्मानंद नक्कीच प्राप्त होतो. आजच्या धावपळीच्या जगात आपले मनही वेगाने धावताना दिसते. यामध्ये सतत विचारांचा प्रवाह असतो ज्यावर नियंत्रण ठेवणे जवळजवळ अशक्य वाटते. मात्र मौन राहणे या कलेतून अनावश्यक ठिकाणी वाया जाणारी ऊर्जा वाचवून या उर्जेचा योग्य ठिकाणी वापर करता येतो. अस्वस्थतेसारख्या समस्यांपासून मुक्त होता येते. मौनामुळे एकाग्रता प्राप्त होते. या अवस्थेत मेंदू दिलेल्या कार्याला अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यास सक्षम असतो. त्याचे फायदे कामाच्या ठिकाणी, शिक्षण, नातेसंबंधांमध्ये दिसून येतात. अनावश्यक स्वत:च्या किंवा इतर आवाजांमुळे मानसिक तणावाची पातळी वाढते. ज्यामुळे विविध शारीरिक, मानसिक विकारांना सामोरे जावे लागते. मौनामुळे विविध समस्या तर सुटतातच शिवाय निद्रानाश यांसारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. मेडिटेशन (ध्यान) आत्मसात व्हायला लागते. थोडी काळजी, जागरूकता घेतली तर जीवनात मौनाद्वारे शांतता वाढवू शकतो. यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. दिवसाची सुरुवात लवकर व्हायला हवी. शांततेच्या क्षणांना जीवनाचा भाग बनवल्यास दूरगामी फायदे होतात. रोज जेव्हा शक्य होईल तेव्हा केवळ दोन तास आतून-बाहेरून मौन ठेवल्यास नक्कीच आत्मानंद प्राप्त करता येतो. आतून-बाहेरून मौन ठेवणे म्हणजे मनातील विचार थांबवत बाहेरील आवाजही न ऐकणे यालाच आतून-बाहेरून मौन ठेवणे असे म्हणतात.
त्रासदायक विचारांना थांबवा..! : दररोज काही वेळ मौन ठेवणे आणि ध्यान करणे ही एक चांगली आध्यात्मिक साधना आहे. मौन धारण केल्यानंतर जे विचार निर्माण होतात, त्या विचारात लहानात लहान इच्छादेखील पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. दिवसभर अनेक विचार मनात येतात काही विचार मनाला त्रासदायकही असतात. अशा विचारांना थांबवल्यास जीवनातील आनंद उपभोगता येतो. यासाठी मौन पाळता आले पाहिजे. यासाठी रोज सराव असणे गरजेचे आहे. बाहेरून मौन आणि मनात विचारांचे काहूर जर असेल तर अशा मौनाला काहीच अर्थ नाही. उलट अशा मौनाने मानसिक स्वास्थ्य बिघडेल. प्रत्येक विचारात रचनात्मक शक्ती असते. याचाच अर्थ जीवन आपल्याला चालवत नाही, तर आपण आपल्या पद्धतीने जीवनाला फिरवू शकतो. काही वेळ मौन धारण केल्यामुळे आपण आपल्या पद्धतीनुसार वातावरण निर्माण करू शकतो. मौनात अधिक फ्रिक्वेन्सी असलेले तरंग असल्यामुळे मौनातून काही विचार बाहेर पडले तर त्यातून चांगले परिणाम साधता येतात.
तंत्रज्ञानाचा हवा योग्य वापर..! : आजच्या अत्याधुनिक युगात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. तंत्रज्ञानाचा याेग्य उपयोग करता आला पाहिजे. मात्र लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेले अन् हरवलेले दिसतात. मानसिक शांतता प्राप्तीसाठी एकांतपणाची गरज असते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानसिक शांतता मिळणे अवघड झाले आहे. याला तंत्रज्ञानाचा दुरुपयोग हेच म्हणावे लागेल. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतानाही दिसत आहेत. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मौन अन् शांतता अतिमहत्त्वाची मानली जाते. मात्र दिवसभर भोवताली विविध कर्कश आवाज, शांतता भंग करणारे विचित्र संगीत अशा विविध गोंगाटामुळे मानसिक आणि शारीरिक व्याधींमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात स्वत:चा आवाज ऐकूच येत नाही, किंवा ऐकून घेण्याचा प्रयत्नही होत नाही. स्वत:ला मनशांतता हवी आहे याचा चक्क विसरच पडतो. यंत्रमानवाप्रमाणे या भूतलावर आपण जगत आहोत; याचे कुठेतरी आत्मपरिक्षण होऊन स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. यावर प्रत्येकाने उपाय शोधायलाच हवा. उपाय अगदी सोप्पा आहे. दिवसभरातून किमान दोन तास तरी एकांतात घालवावा, स्वत:शी हितगुज करावे. त्याचप्रमाणे दोन तास तरी मौन ठेवावे. यातून नक्कीच मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत तर होईलच शिवाय आत्मानंदाचा मार्ग सापडून सुखाचा महासोहळा अनुभवता येईल.
(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा