भगवत गीता : 1 श्लोक 31-40

श्लोक ३१

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे॥

हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही.

श्लोक ३२

न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा॥

हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे?

श्लोक ३३

येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च॥

आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. 

श्लोक ३४

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा॥

गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. 

श्लोक ३५

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते॥

हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? 

श्लोक ३६

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन।
पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः॥ 

हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. 

श्लोक ३७

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌ स्वबान्धवान्‌।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव॥

म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना, आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? ॥ 

श्लोक ३८, ३९

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन॥

जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? 

श्लोक ४०

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत॥

कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली