भगवत गीता : 10 श्लोक 11-20

श्लोक ११

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता॥

त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो.

श्लोक १२, १३

अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्‌।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम्‌॥
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे॥

अर्जुन म्हणाला, आपण परम ब्रह्म, परम धाम, आणि परम पवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन, दिव्य पुरुष, तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता. 

श्लोक १४

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः॥

हे केशवा (अर्थात श्रीकृष्णा), जे काही मला आपण सांगत आहात, ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन्‌ आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव. 

श्लोक १५

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम।
भूतभावन भूतेष देवदेव जगत्पते॥

हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. 

श्लोक १६

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि॥

म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. 

श्लोक १७

कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्‌।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया॥

हे योगेश्वरा, मी कशाप्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन्‌, आपण कोणकोणत्या भावांत माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात? 

श्लोक १८

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन।
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम्‌॥

हे जनार्दना (अर्थात श्रीकृष्णा), आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा. कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहाते. 

श्लोक १९

श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि
दिव्या ह्यात्मविभूतयः।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा (अर्थात कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत, त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन. कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. 

श्लोक २०

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च॥

हे गुडाकेशा (अर्थात अर्जुना), मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!