भगवत गीता : 10 श्लोक 21-30

श्लोक २१

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान्‌।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी॥ 

अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. एकोणपन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. 

श्लोक २२

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना॥

वेदांत सामवेद मी आहे, देवांत इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. 

श्लोक २३

रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम्‌।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्‌॥

अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. मी आठ वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरु पर्वत आहे. 

श्लोक २४

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम्‌।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः॥

पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे. 

श्लोक २५

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्‌।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः॥

मी महर्षींमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ॐ कार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहाणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. 

श्लोक २६

अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः॥

सर्व वृक्षांत पिंपळ आणि देवर्षींमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. 

श्लोक २७

उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम्‌।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्‌॥

घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. 

श्लोक २८

आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्‌।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः॥

मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. 

श्लोक २९

अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्‌।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्‌॥

मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. 

श्लोक ३०

प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्‌।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्‌॥

मी दैत्यांमध्ये प्रह्लाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी विनितापुत्र गरुड आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली