भगवत गीता : 10 श्लोक 31-42
श्लोक ३१
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी॥
मी पवित्र करणाऱ्यांत वायू आणि शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहे. तसेच माशांत मगर आहे आणि नद्यांत भागीरथी गंगा आहे.
श्लोक ३२
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्॥
हे अर्जुना, सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी विद्यांतील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे.
श्लोक ३३
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः॥
मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वंद्व समास आहे. अक्षय काल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराटस्वरूप, सर्वांचे धारण-पोषण करणाराही मीच आहे.
श्लोक ३४
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा॥
सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे.
श्लोक ३५
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः॥
तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंतील वसंत ऋतू मी आहे.
श्लोक ३६
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्॥
मी छल करणाऱ्यांतील द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे. निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्त्विक पुरुषांचा सात्त्विक भाव मी आहे.
श्लोक ३७
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः॥
वृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे.
श्लोक ३८
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्॥
दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे, विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्त्वज्ञान मीच आहे.
श्लोक ३९
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्॥
आणि हे अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे. कारण असे चराचरातील एकही भूत नाही की, जे माझ्याशिवाय असेल.
श्लोक ४०
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया॥
हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), माझ्या विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला.
श्लोक ४१
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम्॥
जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज.
श्लोक ४२
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन।
विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत्॥
किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा