भगवत गीता : 11 श्लोक 1-11
अर्जुन उवाच मदनुग्रहाय
परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम्।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम॥
अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले.
श्लोक २
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्॥
कारण हे कमलदलनयना, मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे.
श्लोक ३
एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम॥
हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात, ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज यांनी युक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहाण्याची इच्छा आहे.
श्लोक ४
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्॥
हे प्रभो, जर मला आपले ते रूप पाहता येईल, असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा.
श्लोक ५
श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थ
रूपाणि शतशोऽथ सहस्रशः।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), आता तू माझी शेकडो-हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पाहा.
श्लोक ६
पश्यादित्यान्वसून्रुद्रानश्विनौ मरुतस्तथा।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत॥
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), माझ्यामध्ये अदितीच्या बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना, दोन्ही अश्विनीकुमारांना आणि एकोणपन्नास मरुद्गणांना पाहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पाहा.
श्लोक ७
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम्।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि॥
हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पाहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल, ते पाहा.
श्लोक ८
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्॥
परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या सहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पाहा.
श्लोक ९
सञ्जय उवाच एवमुक्त्वा
ततो राजन्महायोगेश्वरो हरिः।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्॥
संजय म्हणाले, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी (अर्थात श्रीकृष्णांनी) असे सांगून मग पार्थाला (अर्थात पृथापुत्र अर्जुनाला) परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखविले.
श्लोक १०, ११
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम्।
अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम्॥
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम्।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम्॥
अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, अनंतस्वरूप, सर्व बाजूंना तोंडे असलेल्या विराटस्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा