भगवत गीता : 11 श्लोक 12-20

श्लोक १२

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुस्थिता।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः॥

आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल, तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचितच होईल म्हणजे होणार नाही. 

श्लोक १३

तत्रैकस्थं जगत्‌कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा॥

पांडवाने (पांडुपुत्र अर्जुनाने) त्यावेळी अनेक प्रकारांत विभागलेले संपूर्ण जग देवाधिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. 

श्लोक १४

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत॥

त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला धनंजय (अर्थात अर्जुन), प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धाभक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला

श्लोक १५

अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देव
देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान्‌।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च
सर्वानुरगांश्च दिव्यान्‌॥

अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवांना, शंकरांना, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहात आहे.

श्लोक १६

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि
त्वां सर्वतोऽनन्तरूपम्‌ ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं
पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप॥

हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले, तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहात आहे. हे विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसत, ना मध्य दिसत, ना आरंभ.

श्लोक १७

किरीटिनं गदिनं चक्रिणं च
तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम्‌।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं
समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्‌॥

मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे, प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असे पाहात आहे.

श्लोक १८

त्वमक्षरं परमं वेदितव्यं
त्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता
सनातनस्त्वं पुरुषो मतो मे॥

आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात, असे मला वाटते. 

श्लोक १९

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं
शशिसूर्यनेत्रम्‌। पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं
स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्‌॥

आपण आदी, मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले, चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे, असे आहात, असे मला दिसते. 

श्लोक २०

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि
व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः।
दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं
लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन॥

हे महात्मन्‌, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकल्या आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!