भगवत गीता : 11 श्लोक 21-30
श्लोक २१
अमी हि त्वां सुरसङ्घा विशन्ति केचिद्भीताः
प्राञ्जलयो गृणन्ति। स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः
स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः॥
तेच देवतांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्ध यांचे समुदाय, सर्वांचे कल्याण होवो, अशी मंगलाशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत.
श्लोक २२
रुद्रादित्या वसवो ये च साध्या
विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे॥
अकरा रुद्र, बारा आदित्य तसेच आठ वसू, साध्यगण, विश्वेदेव, दोन अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत, ते सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहात आहेत.
श्लोक २३
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो
बहुबाहूरुपादम्। बहूदरं बहुदंष्ट्राकरालं
दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्॥
हे महाबाहो, आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकूळ होत आहेत. तसेच मीही व्याकूळ होत आहे.
श्लोक २४
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
कारण हे विष्णो, आकाशाला जाऊन भिडलेल्या, तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहेत.
श्लोक २५
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि
दृष्ट्वैव कालानलसन्निभानि।
दिशो न जाने न लभे च शर्म
प्रसीद देवेश जगन्निवास॥
दाढांमुळे भयानक व प्रलयकाळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे. म्हणून हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा.
श्लोक २६, २७
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ
सहास्मदीयैरपि योधमुख्यैः॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति
दंष्ट्राकरालानि भयानकानि।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु
संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः॥
ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत जात आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत.
श्लोक २८
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति॥
ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्यलोकातील वीर आपल्या प्रज्वलित तोंडात शिरत आहेत.
श्लोक २९
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः।
तथैव नाशाय विशन्ति
लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः॥
जसे पतंग नष्ट होण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत.
श्लोक ३०
लेलिह्यसे ग्रसमानः
समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं
भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो॥
आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णो, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा