भगवत गीता : 11 श्लोक 31-40

श्लोक ३१

आख्याहि मे को भवानुग्ररूपो
नमोऽस्तु ते देववर प्रसीद।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं
न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्‌॥

मला सांगा की, भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा, आपणास नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो. कारण आपली ही करणी मला कळत नाही. 

श्लोक ३२

श्रीभगवानुवाच कालोऽस्मि
लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति
सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत, ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार आहे. 

श्लोक ३३

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्‌।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्‌॥

म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यसाची अर्जुना, तू फक्त निमित्तमात्र हो.

श्लोक ३४

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च
कर्णं तथान्यानपि योधवीरान्‌।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा
युध्यस्व जेतासि रणे सपत्‍नान्‌॥

द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिऊ नकोस. युद्धात तू खात्रीने शत्रूंना जिंकशील. म्हणून युद्ध कर. 

श्लोक ३५

सञ्जय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं
केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य॥

संजय म्हणाले, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्‍गदित होऊन तो म्हणाला.

श्लोक ३६

अर्जुन उवाच स्थाने हृषीकेश तव
प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः॥ 

अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी श्रीकृष्णा, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दिशादिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत, हे योग्यच होय. 

श्लोक ३७

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्‌
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे।
अनन्त देवेश जगन्निवास
त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्‌॥ 

हे महात्मन, ब्रह्मदेवाचेही आदिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंता, हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, जे सत, असत व त्यापलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंदघन ब्रह्म आहे, ते आपणच आहात. 

श्लोक ३८

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य
विश्वस्य परं निधानम्‌।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम
त्वया ततं विश्वमनन्तरूप॥

आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच आहात. परम धामही आपणच आहात. हे अनंतरूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे. 

श्लोक ३९

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते॥

आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला हजार वेळा नमस्कार नमस्कार असो. आपणाला आणखीही वारंवार नमस्कार नमस्कार असोत. 

श्लोक ४०

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते
नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं
सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः॥

हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार. हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे. म्हणून आपण सर्वरूप आहात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली