भगवत गीता : 11 श्लोक 41-55
श्लोक ४१, ४२
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं
हे कृष्ण हे यादव हे सखेति।
अजानता महिमानं तवेदं
मया प्रमादात्प्रणयेन वापि॥
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि
विहारशय्यासनभोजनेषु।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्
आपला हा प्रभाव न जाणवल्यामुळे, आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या, असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल, आणि हे अच्युता, माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे.
श्लोक ४३
पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः
कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव॥
आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरू व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीयप्रभावा, त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही. मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल?
श्लोक ४४
तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं
प्रसादये त्वामहमीशमीड्यम्।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्॥
म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे, म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात.
श्लोक ४५
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे।
तदेव मे दर्शय देवरूपं
प्रसीद देवेश जगन्निवास॥
पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकूळही होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णुरूपच दाखवा. हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा.
श्लोक ४६
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि
त्वां द्रष्टुमहं तथैव।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते॥
मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा.
श्लोक ४७
श्रीभगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं
रूपं परं दर्शितमात्मयोगात्।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे
त्वदन्येन न दृष्टपूर्वम्॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय, सर्वांचे आदि, सीमा नसलेले, विराट रूप तुला दाखविले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते.
श्लोक ४८
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न
च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।
एवंरूपः शक्य अहं नृलोके
द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर॥
हे अर्जुना, मानवलोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यांनीही तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही.
श्लोक ४९
मा ते व्यथा मा च विमूढभावो
दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम्।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं
तदेव मे रूपमिदं प्रपश्य॥
माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत हौऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे हे शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पाहा.
श्लोक ५०
सञ्जय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा
स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा
पुनः सौम्यवपुर्महात्मा॥
संजय म्हणाले, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखविले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला.
श्लोक ५१
अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं
रूपं तव सौम्यं जनार्दन।
इदानीमस्मि संवृत्तः
सचेताः प्रकृतिं गतः॥
अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे.
श्लोक ५२
श्रीभगवानुवाच सुदुर्दर्शमिदं
रूपं दृष्टवानसि यन्मम।
देवा अप्यस्य रूपस्य
नित्यं दर्शनकाङ्क्षिणः॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस, ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात.
श्लोक ५३
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा॥
तू जसे मला पाहिलेस, तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही.
श्लोक ५४
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप॥
परंतु हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजरूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्त्वतः जाणणे तसेच (माझ्यात) प्रवेश करणे अर्थात (माझ्याशी) एकरूप होणेही शक्य आहे.
श्लोक ५५
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः।
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव॥
हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्यकर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा, माझा भक्त आसक्तिरहित असतो आणि सर्व भूतमात्राविषयी निर्वैर असतो, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा