भगवत गीता : 13 : श्लोक 1-11

अध्याय १३ – क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

श्लोक १

श्रीभगवानुवाच इदं शरीरं
कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक, क्षेत्रज्ञ असे म्हणतात. 

श्लोक २

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वतः जाणणे, ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे. 

श्लोक ३

तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत्‌।
स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु॥

ते क्षेत्र जे आणि जसे आहे, तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे, ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक.

श्लोक ४

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्‌।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः॥

हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्त्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रांतूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. 

श्लोक ५

महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः॥

पाच महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये, एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 

श्लोक ६

इच्छा द्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्‌॥

तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे. 

श्लोक ७

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्‌।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः॥

मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादींबाबत सरळपणा, श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह 

श्लोक ८

इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्‌॥

इह व पर लोकांतील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे 

श्लोक ९

असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु॥

पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे 

श्लोक १०

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि॥

मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकान्तात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे 

श्लोक ११

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्‌।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा॥

अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे, हे सर्व ज्ञान होय, आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!