भगवत गीता : 2 श्लोक 1-10
सञ्जय उवाच तं तथा
कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः॥
सजंय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले.
श्लोक 2
श्रीभगवानुवाच कुतस्त्वा
कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन॥
श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही.
श्लोक 3
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप॥
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा.
श्लोक 4
अर्जुन उवाच कथं भीष्ममहं
सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन॥
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत.
श्लोक 5
गुरूनहत्वा हि महानुभावाञ्छ्रेयो
भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय
भोगान् रुधिरप्रदिग्धान्॥
म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे.
श्लोक 6
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः
प्रमुखे धार्तराष्ट्राः॥
युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र- आमच्या विरुद्ध उभे आहेत.
श्लोक 7
कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्॥
करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा.
श्लोक 8
न हि प्रपश्यामि
ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं
सुराणामपि चाधिपत्यम् ॥ २-८ ॥
कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही.
श्लोक 9
सञ्जय उवाच एवमुक्त्वा
हृषीकेशं गुडाकेशः परन्तप।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा
तूष्णीं बभूव ह॥
संजय म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला.
श्लोक 10
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः॥
हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा