भगवत गीता : 2 श्लोक 11-20
श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं
प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च
नानुशोचन्ति पण्डिताः॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत.
श्लोक 12
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्॥
मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते, असेही नाही. आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही. ॥ २-१२ ॥
श्लोक 13
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति॥
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही.
श्लोक 14
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः। आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥
हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर.
श्लोक 15
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते
कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो.
श्लोक 16
नासतो विद्यते भावो नाभावो
विद्यते सतः। उभयोरपि
दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः॥
असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.
श्लोक 17
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति॥
ज्याने हे सर्व जग-दिसणाऱ्या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही.
श्लोक 18
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत॥
या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर.
श्लोक 19
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते॥
जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसेच जो हा (आत्मा) मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही.
श्लोक 20
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा
भविता वा न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं
पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे॥
हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा