भगवत गीता : 2 श्लोक 21-30
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे, हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील?
श्लोक 22
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि
संयाति नवानि देही॥
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो.
श्लोक 23
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
श्लोक 24
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः॥
कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहाणारा आणि सनातन आहे.
श्लोक 25
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि॥
हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही.
श्लोक 26
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि॥
परंतु, जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही.
श्लोक 27
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि॥
कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही.
श्लोक 28
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥
हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा.
श्लोक 29
आश्चर्यवत्पश्यति
कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं
वेद न चैव कश्चित्॥
एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहातो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत.
श्लोक 30
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि॥
हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा