भगवत गीता : 2 श्लोक 41-50
श्लोक 41
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्॥
हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते. परंतु अस्थिर विचार असणाऱ्या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात.
श्लोक 42, 43, 44
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलतत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही.
श्लोक 45
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्॥
हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो.
श्लोक 46
यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः॥
सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते.
श्लोक 47
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.
श्लोक 48
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते॥
हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते.
श्लोक 49
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः॥
या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजय अर्जुना, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात.
श्लोक 50
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्॥
समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा