भगवत गीता : 2 श्लोक 51-60
श्लोक 51
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्॥
कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात.
श्लोक 52
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च॥
जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह-पर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील.
श्लोक 53
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि॥
तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल.
श्लोक 54
अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का
भाषा समाधिस्थस्य केशव।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्॥
अर्जुने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो?
श्लोक 55
श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा
कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहातो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते.
श्लोक 56
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते॥
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.
श्लोक 57
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम्।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥
जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते.
श्लोक 58
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥
कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.
श्लोक 59
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते॥
इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते.
श्लोक 60
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः॥
हे कुंतीपुत्र अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा