भगवत गीता : 2 श्लोक 61-72

श्लोक 61

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥

म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. 

श्लोक 62

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. 

श्लोक 63

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. 

श्लोक 64

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति॥

परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.

श्लोक 65

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते॥

अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. 

श्लोक 66

नास्ति बुद्धिर‍युक्तस्य न चायुक्तस्य भावना।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्‌॥

मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? 

श्लोक 67

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि॥

कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. 

श्लोक 68

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥

म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. 

श्लोक 69

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः॥

सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. 

श्लोक 70

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः
प्रविशन्ति यद्वत्‌। तद्वत्कामा यं प्रविशन्ति
सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥

ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. 

श्लोक 71

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति॥

जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शांती मिळते. 

श्लोक 72

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली