भगवत गीता : 1 श्लोक 1-10
श्लोक १
धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव
किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले?
श्लोक २
सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं
व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसङ्गम्य
राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला.
श्लोक ३
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥
अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा.
श्लोक ४, ५, ६
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥
या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत.
श्लोक ७
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं
तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥
हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो.
श्लोक ८
भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥
आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा.
श्लोक ९
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥
इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत.
श्लोक १०
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं
भीमाभिरक्षितम् ॥ १-१० ॥
भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे.
🙏खूपच उपयुक्त व संग्रहनिय 🙏
उत्तर द्याहटवा