भगवत गीता : 4 श्लोक 1-10

अध्याय ४ –  ज्ञानसंन्यासयोग

श्लोक १

श्रीभगवानुवाच इमं विवस्वते
योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌।
विवस्वन्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. 

श्लोक २

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप॥

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला. परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. 

श्लोक ३

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌॥

तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस. म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे. अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. 

श्लोक ४

अर्जुन उवाच अपरं भवतो
जन्म परं जन्म विवस्वतः।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति॥

अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा; आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता, असे कसे समजू? 

श्लोक ५

श्रीभगवानुवाच बहूनि मे
व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. 

श्लोक ६

अजोऽपि सन्नव्ययात्मा
भूतानामीश्वरोऽपि सन्‌।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥

मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. 

श्लोक ७

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌॥

हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. 

श्लोक ८

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥

सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. 

श्लोक ९

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥

हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. 

श्लोक १०

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः॥

पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहात होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!