भगवत गीता : 4 श्लोक 11-20

श्लोक ११

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. 

श्लोक १२

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा॥ 

या मनुष्यलोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात. कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते.

श्लोक १३

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌॥

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टिरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला-अविनाशी परमात्म्याला-तू वास्तविक अकर्ताच समज. 

श्लोक १४

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते॥

कर्मांच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही. 

श्लोक १५

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌॥

पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. 

श्लोक १६

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌॥

कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. 

श्लोक १७

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः॥

कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्मांचे तात्त्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे.

श्लोक १८

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌॥ 

जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. 

श्लोक १९

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः॥

ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. 

श्लोक २०

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः॥

जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यतृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तमप्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली