भगवत गीता : 4 श्लोक 21-30
श्लोक २१
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥
ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरसंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही.
श्लोक २२
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते॥
जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही.
श्लोक २३
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते॥
ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात.
श्लोक २४
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना॥
ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्रुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे, त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.
श्लोक २५
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति॥
दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात.
श्लोक २६
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति॥
दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात.
श्लोक २७
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते॥
अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयमयोगरूपी अग्नी त्यात हवन करतात.
श्लोक २८
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः॥
काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काहीजण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात. तसेच दुसरे काहीजण योगरूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडकव्रते पाळणारे कितीतरी यत्नशील मनुष्य स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात.
श्लोक २९, ३०
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः॥
अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून, प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा