भगवत गीता : 4 श्लोक 31-42

श्लोक ३१

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्‌।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम॥

हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही; तर परलोक कसा सुखदायक होईल? 

श्लोक ३२

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे

अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. 

श्लोक ३३

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते॥

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत्‌ सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. 

श्लोक ३४

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥

ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. 

श्लोक ३५

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि॥

जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस, तसेच हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंदघन परमात्म्यात पाहशील.

श्लोक ३६

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि॥

जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास, तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्याप्रकारे तरून जाशील. 

श्लोक ३७

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा॥

कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो. 

श्लोक ३८

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति॥

या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो.

श्लोक ३९

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥

जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो.

श्लोक ४०

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः॥

अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख. 

श्लोक ४१

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय॥ 

हे धनंजया(अर्जुना), ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत.

श्लोक ४२

तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत॥

म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेकज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली