भगवत गीता : 6 श्लोक 31-47
श्लोक ३१
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते॥
जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व सजीवमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंदघन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात.
श्लोक ३२
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः॥
हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीवमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे.
श्लोक ३३
अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया
प्रोक्तः साम्येन मधुसूदन। एतस्याहं
न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम्॥
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना (श्रीकृष्णा), जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील, असे मला वाटत नाही.
श्लोक ३४
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्॥
कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल, क्षोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडविण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो.
श्लोक ३५
श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो
मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु
कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते.
श्लोक ३६
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः॥
ज्याने मनावर ताबा मिळविला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे, असे माझे मत आहे.
श्लोक ३७
अर्जुन उवाच अयतिः श्रद्धयोपेतो
योगाच्चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धिं
कां गतिं कृष्ण गच्छति॥
अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत्साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?
श्लोक ३८
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि॥
हे महाबाहो श्रीकृष्णा, भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?
श्लोक ३९
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते॥
हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल. कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही.
श्लोक ४०
श्रीभगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य
विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं
तात गच्छति ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत्प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही.
श्लोक ४१
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा
शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां
गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥
योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो.
श्लोक ४२
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्॥
किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकांत न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे, तो या जगात निःसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे.
श्लोक ४३
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन॥
तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्वबुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे कुरुवंशीय अर्जुना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मप्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो.
श्लोक ४४
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते॥
तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निःसंशयपणे भगवंतांकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासूदेखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो.
श्लोक ४५
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्॥
परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो.
श्लोक ४६
तपस्विभ्योऽधिको योगी
ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी
तस्माद्योगी भवार्जुन॥
तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे. आणि सकाम कर्मे करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो.
श्लोक ४७
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः॥
सर्व योग्यांच्यामध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो, तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा