भगवत गीता : 7 श्लोक 1-10
अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
श्लोक १
श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः
पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त, सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निःसंशयपणे जाणशील, ते ऐक.
श्लोक २
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते॥
मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहात नाही.
श्लोक ३
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः॥
हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मत्परायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो.
श्लोक ४
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा॥
पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे.
श्लोक ५
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्॥
ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो अर्जुना, हिच्याहून दुसरी, जिच्यायोगे सर्व जग धारण केले जाते, ती माझी जीवरूप परा म्हणजे चेतन प्रकृती समज.
श्लोक ६
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा॥
सर्व सजीवमात्र या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे, आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे, हे तू जाण.
श्लोक ७
मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव॥
हे धनंजया (अर्जुना), माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे, तसे माझ्यात गुंफलेले आहे.
श्लोक ८
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु॥
हे कुंतीपुत्र अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्रसूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे.
श्लोक ९
पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेचश्चास्मि विभावसौ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु॥
मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे. तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यांतील तप मी आहे.
श्लोक १०
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा