भगवत गीता : 7 श्लोक 21-30
श्लोक २१
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्॥
जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो.
श्लोक २२
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान्॥
तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो.
श्लोक २३
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम्।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि॥
पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त, मला कसेही भजोत, अंती मलाच येऊन मिळतात.
श्लोक २४
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्॥
मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन-इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या, सच्चिदानंदघन परमात्मस्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात.
श्लोक २५
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्॥
आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा-मरणारा आहे, असे समजतात.
श्लोक २६
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन॥
हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो. पण श्रद्धा, भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही.
श्लोक २७
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप॥
हे भरतवंशी परंतप अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात.
श्लोक २८
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः॥
परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते राग-द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात.
श्लोक २९
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्॥
जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. ॥ ७-२९ ॥
श्लोक ३०
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः॥
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा