भगवत गीता : 8 श्लोक 11-20

श्लोक ११

यदक्षरं वेदविदो वदन्ति
विशन्ति यद्यतयो वीतरागाः।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते
पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये॥

वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्‍नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. 

श्लोक १२, १३

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्‌॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्‌।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌॥

सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ॐ या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी आहे त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परम गतीला प्राप्त होतो.

श्लोक १४

अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. 

श्लोक १५

मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्‌।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः॥

परम सिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगार असलेल्या क्षणभंगुर पुनर्जन्माला जात नाहीत. 

श्लोक १६

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते॥

हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत. परंतु हे कौन्तेया (कुंतीपुत्र अर्जुना), मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. (कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत.) 

श्लोक १७

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः॥

ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्त्वतः जाणतात, ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. 

श्लोक १८

अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसञ्ज्ञके॥

सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात.

श्लोक १९

भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. 

श्लोक २०

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति॥

त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली, तरी नाहीसा होत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली