भगवत गीता : 8 श्लोक 21-28
श्लोक २१
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम॥
त्याला अव्यक्त, अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय.
श्लोक २२
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया।
यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे.
श्लोक २३
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ॥
हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन.
श्लोक २४
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः॥
ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्लपक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात.
श्लोक २५
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते॥
ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्णपक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्मांची फळे भोगून परत येतो.
श्लोक २६
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः॥
कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यांतील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही, अशा मार्गाने गेलेला त्या परम गतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म-मृत्यूला प्राप्त होतो.
श्लोक २७
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), अशा रीतीने या दोन मार्गांना तत्त्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धिरूप योगाने युक्त हो अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो.
श्लोक २८
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु
यत्पुण्यफलं प्रदिष्टम्।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा
योगी परं स्थानमुपैति चाद्यम्॥
योगी पुरुष या रहस्याला तत्त्वतः जाणून, वेदांचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफळ सांगितले आहे, त्या सर्वाला निःसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा