भगवत गीता : 9 श्लोक 11-20
श्लोक ११
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्॥
माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्यशरीर धारण करणाऱ्या मला-सर्व भूतांच्या महान ईश्वराला-तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात.
श्लोक १२
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः॥
ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहातात.
श्लोक १३
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्॥
परंतु हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.
श्लोक १४
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते॥
ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात.
श्लोक १५
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्॥
दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण-निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट-स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात.
श्लोक १६
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्॥
श्रौतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषध मी आहे. मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे.
श्लोक १७
पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः।
वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च॥
या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा, आई-वडील, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ॐ कार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे.
श्लोक १८
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्॥
प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती-प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे.
श्लोक १९
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन॥
मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे, आणि सत् व असत् सुद्धा मीच आहे.
श्लोक २०
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति
दिव्यान्दिवि देवभोगान्॥
तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात; ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा