भगवत गीता : 9 श्लोक 21-34

श्लोक २१

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे
पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते॥

ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या, तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात. 

श्लोक २२

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌॥

जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. 

श्लोक २३

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्‌॥

हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात. परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते.

श्लोक २४

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते॥

कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत; म्हणून पुनर्जन्म घेतात. 

श्लोक २५

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌॥

देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. 

श्लोक २६

पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥

जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. 

श्लोक २७

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌॥

हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. 

श्लोक २८

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि॥

अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभफळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. 

श्लोक २९

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्‌॥

मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. 

श्लोक ३०

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः॥

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, असा पूर्ण निश्चय केलेला असतो. 

श्लोक ३१

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति॥

तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की, माझा भक्त नाश पावत नाही. 

श्लोक ३२

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्‌॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडाळादी कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात. 

श्लोक ३३

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌॥

मग पुण्यशील, ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे? म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्यशरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर. 

श्लोक ३४

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः॥ 

माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!