भगवत गीता : 13 : श्लोक 12-25

श्लोक १२

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते॥

जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो, ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादी परम ब्रह्म सत्‌ ही म्हणता येत नाही आणि असत्‌ ही म्हणता येत नाही 

श्लोक १३

सर्वतःपाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम्‌।
सर्वतःश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति॥

ते सर्व बाजूंनी हात-पाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे. कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. 

श्लोक १४

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम्‌।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च॥

ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे. परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्तिरहित असूनही सर्वांचे धारण-पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे. 

श्लोक १५

बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च।
सूक्ष्मात्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्‌॥

ते चराचर सर्व प्राणिमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही. तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे. 

श्लोक १६

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम्‌।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च॥

तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णुरूपाने भूतांचे धारणपोषण करणारा, रुद्ररूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेवरूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. 

श्लोक १७

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्‌॥

ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्त्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेषरूपाने राहिलेला आहे. 

श्लोक १८

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते॥

अशाप्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्त्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. 

श्लोक १९

प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्‌॥

प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत, असे तू समज आणि राग-द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत, असे समज. 

श्लोक २०

कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते॥

कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. 

श्लोक २१

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान्गुणान्‌।
कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु॥

प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या-वाईट योनींत जन्म मिळण्याला कारण आहे. 

श्लोक २२

उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन्पुरुषः परः॥

या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता, सर्वांचे धारण-पोषण करणारा म्हणून भर्ता, जीवरूपाने भोक्ता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंदघन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो. 

श्लोक २३

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते॥

अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. 

श्लोक २४

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना।
अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे॥

त्या परमात्म्याला काहीजण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहातात. दुसरे काहीजण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहातात म्हणजेच प्राप्त करून घेतात. 

श्लोक २५

अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते।
तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः॥

परंतु यांखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत, ते अशाप्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्युरूप संसारसागर खात्रीने तरून जातात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली