भगवत गीता : 14 : श्लोक 1-10
अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
श्लोक १
श्रीभगवानुवाच परं भूयः
प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्।
यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्ञानांतीलही अती उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत.
श्लोक २
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च॥
हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ हौत नाहीत.
श्लोक ३
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम्।
सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत॥
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), माझी महद्ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतनसमुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड-चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते.
श्लोक ४
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः॥
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता॥
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे.
श्लोक ५
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्॥
हे महाबाहो अर्जुना, सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात.
श्लोक ६
तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम्।
सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ॥
हे निष्पाप अर्जुना, त्या तीन गुणांमधील सत्त्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो.
श्लोक ७
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्॥
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), रागरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यांपासून उत्पन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवात्म्याला कर्मांच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो.
श्लोक ८
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम्।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत॥
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी बांधतो.
श्लोक ९
सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत।
ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत॥
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), सत्त्वगुण सुखाला, रजोगुण कर्माला तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो.
श्लोक १०
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत।
रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा॥
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्त्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा