भगवत गीता : 16 : श्लोक 1-10

अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग

श्लोक १

श्रीभगवानुवाच अभयं
सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्‌॥ 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भयाचा संपूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्त्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन-पाठन, भगवंतांच्या नामांचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता 

श्लोक २

अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌॥

काया-वाचा-मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे 

श्लोक ३

तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत॥

तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कोणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे – ही सर्व हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. 

श्लोक ४

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्‌॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. 

श्लोक ५

दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता।
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव॥

दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), तू शोक करू नकोस. कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस. 

श्लोक ६

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिनदैव आसुर एव च।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), या जगात मनुष्यसमुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यांपैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्यसमुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. 

श्लोक ७

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते॥

आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. 

श्लोक ८

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्‌ ।
अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम्‌॥

ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की, हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्रीपुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे. त्याशिवाय दुसरे काय आहे? 

श्लोक ९

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः॥ 

या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. 

श्लोक १०

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः।
मोहाद्‌गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः॥

ते दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली