भगवत गीता : 16 : श्लोक 11-24
श्लोक ११
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः॥
तसेच ते आमरणान्त असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे, असे मानणारे असतात.
श्लोक १२
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्॥
शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम-क्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात.
श्लोक १३
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्॥
ते विचार करतात की, मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल.
श्लोक १४
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी॥
या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे.
श्लोक १५, १६
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः॥
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ॥
मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन. दाने देईन. मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगांत अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात.
श्लोक १७
आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्॥
ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधिहीन यज्ञ करतात.
श्लोक १८
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः॥
ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरांत असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात.
श्लोक १९
तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान्।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु॥
त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूरकर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनींतच टाकतो.
श्लोक २०
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्॥
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), ते मूढ मला न प्राप्त होता जन्मोजन्मी आसुरी योनींतच जन्मतात. उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात. अर्थात घोर नरकांत पडतात.
श्लोक २१
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्॥
काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा.
श्लोक २२
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्॥
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परम गती मिळवितो. अर्थात मला येऊन मिळतो.
श्लोक २३
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्॥
जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही.
श्लोक २४
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि॥
म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा