भगवत गीता : 17 : श्लोक 11-20
श्लोक ११
अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते।
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः॥
जो शास्त्रविधीने नेमून दिलेला, यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो, तो सात्त्विक यज्ञ होय.
श्लोक १२
अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत्।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्॥
परंतु हे भरतश्रेष्ठा (अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज.
श्लोक १३
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम्।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते॥
शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ असे म्हणतात.
श्लोक १४
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते॥
देव, ब्राह्मण, गुरू व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, हे शारीरिक तप म्हटले जाते.
श्लोक १५
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते॥
जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते.
श्लोक १६
मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते॥
मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवच्चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता, हे मनाचे तप म्हटले जाते.
श्लोक १७
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते॥
फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्त्विक तप म्हणतात.
श्लोक १८
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत्।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्॥
जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस असे म्हटले आहे.
श्लोक १९
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्॥
जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे.
श्लोक २०
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्॥
दान देणे कर्तव्य आहे, या भावनेने जे दान, देश, काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्त्विक म्हटले गेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा