भगवत गीता : 17 : श्लोक 21-28
श्लोक २१
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्॥
परंतु जे दान क्लेशपूर्वक, प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान राजस म्हटले आहे.
श्लोक २२
अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्॥
जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.
श्लोक २३
ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा॥
ॐ तत् सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.
श्लोक २४
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्॥
म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तप रूप क्रियांचा नेहमी ॐ या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो.
श्लोक २५
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः॥
तत् या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दान रूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात.
श्लोक २६
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते॥
सत् या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), उत्तम कर्मातही सत् शब्द योजला जातो.
श्लोक २७
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते॥
तसेच यज्ञ, तप आणि दान यांमध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत् असे म्हटले जाते.
श्लोक २८
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व असत् म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा